लासलगाव : कांदा, मका, सोयाबीननंतर यंदाच्या हंगामात प्रथमच लासलगाव बाजार समितीत गव्हाची विक्रमी आवक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मागील काही वर्षाच्या तुलनेत यंदा प्रथमच गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजारपेठेत गहू उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच गर्दी झाली होती.
बाजार समितीच्या धान्य आवारात गव्हाची ३५०० क्विंटल आवक होऊन कमीत कमी दर २००० रुपये, जास्तीत जास्त दर २६२७ रुपये तर सरासरी दर २२५५ रुपये होता. यंदा हिवाळ्यातील पोषक थंडी, योग्य वेळी झालेला पाऊस यामुळे गव्हाच्या पिकाला अनुकूल वातावरण मिळाले.
परिणामी दाण्याची भरघोस वाढ होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. कृषी तज्ज्ञांच्या मते, तापमानातील स्थिरता आणि रोगांचा कमी प्रादुर्भाव ही उत्पादनवाढीची प्रमुख कारणे ठरली. कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे आर्थिक फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी गहू पीक तारणहार ठरले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत बदल करून गव्हाची लागवड केली, त्यांना तुलनेने स्थिर उत्पन्न मिळत आहे.
यंदा झालेली गव्हाची मोठी आवक ही गेल्या काही वर्षातील लक्षणीय घडामोड मानली जात आहे. हवामानाचा सकारात्मक परिणाम, बदलती पीकपद्धती आणि बाजारातील स्थिर मागणी यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा हंगाम काहीसा दिलासादायक ठरत असल्याचे चित्र आहे.
गव्हाची आवक वाढण्यामागची कारणे
हंगामात अनुकूल हवामान, सिंचनाच्या सोयींमध्ये वाढ, सुधारित बियाण्यांचा वापर, कांदा पिकातील तोट्यामुळे शेतकऱ्यांचा गव्हाकडे कल ही मुख्य कारणे आहेत. मागील वर्षी लासलगाव बाजार समितीत ६३,५१,७०६ क्विंटल गव्हाची आवक झाली होती. त्यावेळी किमान १५०२, कमाल ३७००, सरासरी २७१६ दर होता.
आजचे गहू बाजारभाव
| बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
|---|---|---|---|---|---|---|
| 08/04/2026 | ||||||
| पालघर (बेवूर) | --- | क्विंटल | 120 | 3220 | 3220 | 3220 |
| जळगाव - मसावत | १४७ | क्विंटल | 40 | 2200 | 2200 | 2200 |
| नागपूर | लोकल | क्विंटल | 2619 | 2050 | 2216 | 2174 |
| उल्हासनगर | लोकल | क्विंटल | 600 | 3000 | 3200 | 3100 |
| पुणे | शरबती | क्विंटल | 568 | 4000 | 5200 | 4600 |
| नागपूर | शरबती | क्विंटल | 2000 | 3200 | 3500 | 3425 |
