नाशिक : यंदा मे महिन्यापासून असलेल्या पावसाचा फटका जिल्ह्यातील द्राक्ष पिकाला बसला आहे. यामुळे फळधारणा कमी झाली असून एकूणच द्राक्षांच्या उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. येवला तालुक्यामध्ये द्राक्षांची काढणी सुरू झाली असून सध्या रशियासह युरोपातील देशांमध्ये द्राक्षांची निर्यात सुरु झाली आहे.
यंदा मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाल्याने एप्रिलमध्ये छाटणी केलेल्या द्राक्षबागांवर संकट ओढावले. द्राक्षवेलींची काडी परिपक्व न झाल्याने फळधारणा अपेक्षित प्रमाणात झाली नाही. परिणामी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षबागांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी अर्ली द्राक्ष छाटणीचा प्रयोग केला; मात्र त्या बागाही तडाख्यात सापडल्या. यामुळे उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे.
द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली असून, दरवर्षीप्रमाणे होणारी आर्थिक उलाढाल मात्र थंडावली आहे. हंगाम उशिरा सुरू झाला. प्रारंभीच द्राक्षाला प्रतिकिलो १२५ ते २०० रुपये दर मिळत आहेत. सध्या युरोप व रशिया या देशांत द्राक्षांची निर्यात सुरू असून, शरद सीडलेस व नानासाहेब पर्पल या वाणांना प्रतिकिलो २०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.
थॉमसनसह इतर निर्यातक्षम वाणांना सव्वाशे ते दीडशे रुपये दर असून, स्थानिक मालाला ७० ते ८० रुपये दर मिळत आहे. जिल्ह्यातील जवळपास ६० ते ७० टक्के द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने एकूण उत्पादनात मोठी घट झाल्याचे उत्पादक सांगत आहेत.
शेतकऱ्यांनी द्राक्षबागेवर चालवली कुऱ्हाड
यंदा ६० ते ७० टक्के द्राक्षबागांना फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षबागेवर कुन्हाड चालवली. बाजारभाव जास्त वाटत असला त्या तुलनेत जमा-खर्चाची जुळवणी करताना शेतकऱ्यांना अडचणीचे होत आहे.
१९ सप्टेंबर रोजी द्राक्षाची छाटणी केली. छाटणी केल्यावर मालही भरपूर आला. पण, निर्यातक्षम द्राक्षाला दीडशे रुपये भाव मिळाला. परंतु, मोठ्या प्रमाणात खर्चही करावा लागला.
- भाऊसाहेब शेळके, द्राक्ष निर्यातदार, जळगाव नेऊर, येवला
