सलीम सय्यद
गहू, ज्वारी, हरभऱ्यासारखी पारंपरिक पिकं आता मागे पडत आहेत... शेतकरी वळलेत भाजीपाला उत्पादनाकडे. कारण फक्त एकच नियमित उत्पन्न आणि थेट बाजारपेठेचा फायदा. पाण्याची उपलब्धता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने, भाजीपाला शेती आता अनेक शेतकऱ्यांसाठी शाश्वत आर्थिक पर्याय ठरतोय.(Vegetable Market)
शेती परंपरेनुसार ज्वारी, हरभरा, गहू अशी पारंपरिक पिके घेतली जात असली, तरी आता शेतकऱ्यांचा कल बदलू लागला आहे. आज अनेक शेतकरी भाजीपाला उत्पादनाकडे वळताना दिसत आहेत.
या शेतीमुळे त्यांना नियमित उत्पन्न, थेट बाजारपेठ आणि जलद परतावा मिळतो आहे. हेच कारण आहे की, धान्याच्या तुलनेत भाजीपाल्याचे महत्त्व झपाट्याने वाढतेय.(Vegetable Market)
धान्याच्या तुलनेत सातत्यपूर्ण परतावा!
गहू, हरभरा, मका, ज्वारी यासारखी पारंपरिक धान्यपिके एकदाच उत्पन्न देणारी असतात, तीही कधी-कधी बाजारात योग्य भावाने विकली जात नाहीत. याच्या उलट, भाजीपाला पिके आठवड्याला बाजारात विक्रीस उपलब्ध होतात आणि दर कमी-जास्त असले तरी नियमित पैसा हातात येतो.
टोमॅटो, वांगी, कोथिंबीर, मिरची, भेंडी यासारखी भाजीपाला पिके छोट्या जमिनीत, कमी कालावधीत उत्पादन देतात. पाणी आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून ही शेती अधिक फायदेशीर ठरते.
ठिबक, मल्चिंग, हरितगृह वापर वाढतोय
पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पिकांऐवजी भाजीपाल्याकडे वळण्याची रणनीती स्वीकारली आहे.
ठिबक सिंचन, मल्चिंग, हरितगृह या आधुनिक पद्धतींचा वापर करून अल्पभूधारक शेतकरीही चांगले उत्पादन घेत आहेत.
धान्याची आवक घटली, परराज्यांवर अवलंबित्व वाढलं
अहमदपूर बाजारात सध्या गहू, हरभरा, मका, ज्वारी यासारख्या धान्यांची आवक परराज्यातून होतेय. स्थानिक शेतकरी मात्र फळभाज्या, पालेभाज्या, मिरची, टोमॅटो, कारली यांसारख्या पिकांकडे वळले आहेत.
मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर महाराष्ट्र येथून धान्य येतंय, तर अहमदपूर व परिसरातून भाजीपाला परराज्यांत जातोय.
भाजीपाला परराज्यांतही पोहोचतोय!
टोमॅटो : कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश
कोथिंबीर, मिरची : नांदेड, नागपूर, हैदराबाद
वांगी, ढोबळी मिरची, फुलकोबी : पुणे, मुंबई मार्गे देशभरात
भाजीपाला का फायदेशीर?
निकष | पारंपरिक पिके | भाजीपाला |
---|---|---|
परतावा | वर्षातून एकदाच | आठवड्याला/पंधरवड्याला |
उत्पादन कालावधी | जास्त | कमी |
जमीन | मोठी आवश्यक | कमी क्षेत्रात शक्य |
बाजारपेठ | मर्यादित, हमीभावाश्रित | थेट विक्री, वेगळी दरपातळी |
फायदे | कमी | जास्त, सतत |
शेतकरी कशामुळे वळले भाजीपाल्याकडे?
शेतीचे विभाजन : जमिनीचे तुकडे लहान झाल्यामुळे भाजीपाला फायदेशीर
पाणी उपलब्धता : ठिबक, विहीर, शेततळ्यामुळे सुलभ सिंचन
बाजारपेठ : शहरीकरणामुळे मागणी वाढली
सातत्यपूर्ण विक्री : उत्पन्न नियमित
परराज्यात निर्यात : चांगले दर मिळण्याची शक्यता