Tur Market Update : मागील काही दिवसांपासून तुरीच्या दरात सातत्याने वाढ होत असून, बुधवार (८ ऑक्टोबर) रोजी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला कमाल ६ हजार ८६० रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला. (Tur Market Update)
दर वाढत असला तरीही तो शासनाने निश्चित केलेल्या हमीभावापेक्षा कमीच आहे. सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने बाजारात तेजी दिसून येत आहे. (Tur Market Update)
शेतकरी विक्रीकडे वळले
तुरीचा नवीन हंगाम सुरू होण्यासाठी अजून सुमारे दीड महिना बाकी आहे. त्यामुळे जुन्या साठवलेल्या तुरीची विक्री सुरू झाली आहे. दर वाढल्याने अनेक शेतकरी साठवलेली तूर बाजारात आणत असून, त्यामुळे आवकही वाढते आहे.
मागील आठवड्यापर्यंत बाजारात तुरीला सरासरी ६ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. मात्र, गेल्या दोन दिवसांत या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे व्यापाऱ्यांचीही खरेदी वाढली आहे.
बाजार समिती | कमाल दर (रु./क्विंटल) | आवक (क्विंटल) |
---|---|---|
वाशिम | ६,८६० | २,५०० |
कारंजा | ६,७०५ | १,१०० |
मानोरा | ६,७५१ | २५० |
रिसोड | ६,५७५ | २१० |
मंगरुळपीर | ६,५९० | ६५० |
भाववाढीची कारणे
* बाजारात आवक कमी झाल्याने मागणी वाढली.
* गुणवत्तायुक्त तुरीला व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
* आंतरराज्यीय खरेदीदारांची मागणी वाढली.
* शेतकऱ्यांनी साठवलेली तूर विक्रीस काढली.
हमीभाव अजून गाठायचा
गेल्या वर्षी शासनाने तुरीसाठी ७ हजार ५५० रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव जाहीर केला होता. मात्र, सध्याचे दर अजूनही या पातळीवर पोहोचलेले नाहीत. दर वाढत असले तरी हमीभावाच्या तुलनेत ७०० ते ८०० रुपयांनी कमीच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांप्रमाणे समाधानकारक भाव अद्याप मिळालेला नाही.
तुरीच्या बाजारभावात सध्या वाढीचा कल कायम आहे. मागणी वाढत असल्याने येत्या काही दिवसांत दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, हमीभाव गाठण्यासाठी अजून वेळ लागेल, असा अंदाज बाजार तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : ५४ हजार क्विंटल सोयाबीनची आवक; जाणून घ्या आजचे बाजारभाव