Tur Market : खुल्या बाजारात तुरीच्या दराने मोठी उसळी घेतली असून प्रतिक्विंटल दर साडेसात हजारांच्या घरात पोहोचले आहेत. यंदा खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका तुरीच्या पिकाला बसल्याने उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. (Tur Market)
अनेक ठिकाणी पिक हातातून गेल्यामुळे बाजारात तुरीची आवक मर्यादित असून, त्याचा थेट परिणाम दरवाढीवर होत असल्याचे चित्र आहे. (Tur Market)
खामगावसह परिसरात सध्या हंगाम संपल्यानंतर शिल्लक राहिलेली तूर बाजारात विक्रीसाठी येत आहे. मात्र, उत्पादन घटल्याने मालाची उपलब्धता कमी असून मागणी मात्र कायम असल्याने दरात वाढ होत आहे. व्यापाऱ्यांकडून दर्जेदार तुरीला विशेष पसंती दिली जात असल्याचे दिसून येते. (Tur Market)
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला यंदा विक्रमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २१ जानेवारी रोजी वाशिम बाजारात प्रतिक्विंटल ६ हजार ७४० ते ७ हजार ७५० रुपये असा उच्चांकी दर नोंदविण्यात आला.
विशेष म्हणजे हा दर जालना व खामगावसारख्या प्रमुख बाजार समित्यांच्या तुलनेत सुमारे २४० रुपयांनी अधिक असल्याचे बाजारभाव तुलनेतून स्पष्ट झाले आहे.
बुधवारी वाशिम बाजार समितीत सुमारे १ हजार २०० क्विंटल तुरीची आवक झाली होती. चमकदार व दर्जेदार दाण्याच्या मालाला व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी राहिल्याने स्पर्धात्मक लिलाव झाले आणि दर विक्रमी पातळीवर पोहोचले.
स्थानिक व्यापाऱ्यांसह बाहेरील जिल्ह्यांतील खरेदीदारांनीही वाशिम बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याची माहिती बाजार समितीचे सभापती महादेवराव काकडे यांनी दिली.
महादेवराव काकडे यांनी सांगितले की, अन्य शेतीमालाच्या तुलनेत यंदा तुरीचे उत्पादन कमी आहे. त्यातच दर्जेदार मालाची मागणी, साठेबाजीवरील निर्बंध आणि बाजारातील वाढती गरज यामुळे आगामी काळातही तुरीचे दर स्थिर राहण्याची किंवा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर विक्री करताना विविध बाजार समित्यांतील दरांची तुलना करूनच निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
जालना व खामगाव बाजार समित्यांमध्ये बुधवारी तुरीला सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याची नोंद आहे. मात्र, त्या तुलनेत वाशिममध्ये अधिक दर मिळत असल्याने केवळ वाशिम जिल्ह्यातूनच नव्हे, तर शेजारील जिल्ह्यांतूनही तुरीचा माल विक्रीसाठी वाशिम बाजारात येत असल्याचे चित्र आहे.
उत्पादन घट आणि वाढती मागणी यामुळे आगामी काही महिने तुरीचे दर सध्याच्या पातळीवर टिकून राहतील किंवा वाढतील, अशी शक्यता वर्तविली जात असून, शेतकऱ्यांसाठी ही बाब दिलासादायक ठरत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Tur Market : तुरीच्या दरात अचानक उसळी; दरवाढीचं नेमकं गणित काय? वाचा सविस्तर
