Tur Market : नैसर्गिक संकटांमधून कसाबसा बचावलेल्या तूर पिकाला आता पडत्या भावाचा फटका बसत आहे.(Tur Market)
मागील आठवड्यात साडेआठ ते नऊ हजारांच्या घरात गेलेला दर अचानक घसरल्याने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ५०० ते ७०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. परिणामी, तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.(Tur Market)
अतिवृष्टीतून वाचली, पण बाजारात घसरली
यंदाच्या खरीप हंगामात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील मोठ्या क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले.
तूर, कापूस आणि इतर पिकांनाही त्याचा फटका बसला. या संकटातून वाचलेल्या तुरीची काढणी पूर्ण झाली असून शेतकरी विक्रीसाठी माल बाजारात आणत आहेत.
मात्र, हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती च्या मोंढ्यात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जवळपास ९ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेलेला दर आता घसरून ७ हजार ५०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान आला आहे.
मोंढ्यात दरातील चढ-उतार
| दिनांक | आवक (क्विंटल) | सरासरी भाव (₹) |
|---|---|---|
| २ फेब्रु | ५२० | ८,६०५ |
| ३ फेब्रु | ७०० | ८,५०० |
| ४ फेब्रु | ६०० | ७,९०० |
| ५ फेब्रु | ६०० | ८,०५० |
| ६ फेब्रु | ७०० | ७,३६५ |
| ७ फेब्रु | ६०० | ८,०२५ |
| ९ फेब्रु | ५५० | ७,८८० |
| १० फेब्रु | ८०० | ८,१०० |
| ११ फेब्रु | ६१५ | ७,९५० |
| १२ फेब्रु | ५०० | ७,६७७ |
| १६ फेब्रु | ४२० | ७,५४५ |
दरातील सातत्याने होणारे बदल शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
क्विंटलमागे ७०० रुपयांचा घाटा
भाव वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी जानेवारी अखेर आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला विक्री रोखून धरली.
मात्र, अपेक्षेप्रमाणे दर वाढले नाहीत; उलट घसरण झाली. परिणामी, प्रति क्विंटल ५०० ते ७०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. साठा करून ठेवलेल्या शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे.
बाजारातील अनिश्चिततेचा फटका
बाजारातील अस्थिरता आणि मागणी-पुरवठ्याचे बदलते समीकरण यामुळे दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत.
उत्पादन कमी असतानाही दर घसरणे हे बाजारातील अनिश्चिततेचे लक्षण मानले जात आहे. येत्या काळात दर वाढतील की आणखी घसरण होईल, याबाबत व्यापारीही स्पष्ट आश्वासन देत नाहीत.
लागवड खर्च वसूल होणे कठीण
बियाणे, खत, मजुरी आणि काढणी खर्च वाढलेला असताना सध्याचे दर शेतकऱ्यांसाठी समाधानकारक नाहीत. उत्पादन कमी आणि दरात घसरण या दुहेरी फटक्यामुळे तूर उत्पादक अडचणीत सापडले आहेत.
पुढील दिशा काय?
शेतकऱ्यांनी बाजारातील परिस्थिती पाहून टप्प्याटप्प्याने विक्री करावी, असा सल्ला कृषितज्ज्ञ देत आहेत. तसेच शासकीय हमीभाव आणि खरेदी केंद्रांच्या कार्यक्षमतेकडेही शेतकरी अपेक्षेने पाहत आहेत.
नैसर्गिक संकटांनंतर आता बाजारातील अनिश्चिततेचा मार बसल्याने तूर उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
हे ही वाचा सविस्तर : Halad Market : हळदीचे दर कोसळले; आठवड्यातच 'इतक्या' रुपयांची घसरण वाचा सविस्तर
