Tur Market : नवीन तूरबाजारात येताच भाव घसरले. काढणीचा वेग वाढल्यामुळे राज्यात तुरीची आवक (Tur Arrivals) जवळपास दुप्पट झाली असली, तरी दर मात्र हमीभावाच्या खालीच फिरत आहेत.(Tur Market)
राज्यात तुरीची काढणी वेगाने सुरू झाल्याने बाजारात तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.गत आठवड्याच्या तुलनेत राज्यस्तरावर तुरीची आवक (Tur Arrivals) तब्बल ९२.८ टक्क्यांनी वाढल्याची माहिती 'स्मार्ट'च्या बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षाच्या साप्ताहिक अहवालातून समोर आली आहे. (Tur Market)
मात्र, आवक वाढूनही मागणी मर्यादित असल्याने तुरीच्या दरांवर दबाव निर्माण झाला असून बाजारभावात घसरण नोंदविली जात आहे.अहवालानुसार, मागील आठवड्यात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीचा सरासरी दर ७ हजार १०० रुपये प्रति क्विंटल इतका नोंदविण्यात आला.
तथापि, त्याआधीच्या आठवड्याच्या तुलनेत तुरीच्या दरात १.२ टक्क्यांची घट झाली असून ही घसरण शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.
काढणी पूर्णत्वाकडे; बाजारात आवक वाढली
तुरीची वाढलेली आवक ही बहुतांश भागांत काढणी अंतिम टप्प्यात पोहोचल्यामुळे आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात माल बाजारात आणण्यास सुरुवात केल्यामुळे झाल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
खरीप हंगामात अनुकूल पाऊस आणि पोषक हवामानामुळे अनेक भागांत तुरीचे उत्पादन समाधानकारक झाले असून, त्याचा परिणाम सध्या बाजारातील आवकेत स्पष्टपणे दिसून येत आहे.
दर आधारभूत किमतीखालीच
आवक वाढली असली तरी बाजारातील तुरीचे दर किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) कमी असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित आर्थिक लाभ मिळत नसल्याचे चित्र राज्यभरातील बाजारांमध्ये दिसून येत आहे.
केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२५–२६ साठी तुरीचा किमान आधारभूत दर ८ हजार रुपये प्रति क्विंटल जाहीर केला आहे. मात्र प्रत्यक्ष बाजारात शेतकऱ्यांना ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यानच भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे.
प्रमुख बाजारांतील दर
मागील आठवड्यात राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर वेगवेगळ्या पातळीवर नोंदविले गेले.
जालना बाजार: सरासरी दर सर्वाधिक ७ हजार ४९१ रुपये प्रति क्विंटल
लातूर बाजार: सरासरी ७ हजार १०० रुपये प्रति क्विंटल
कारंजा बाजार: तुलनेने कमी दर, सरासरी ६ हजार ७७८ रुपये प्रति क्विंटल
या सर्व बाजारांमध्ये दर हमीभावापेक्षा कमीच राहिल्याचे स्पष्ट होते.
शेतकऱ्यांची चिंता वाढली
हंगामाच्या सुरुवातीलाच दर हमीभावाखाली आल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गणिते बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे. उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक आणि इतर खर्च लक्षात घेतले असता सध्याचे दर समाधानकारक नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. दर वाढीसाठी हमीभावाने खरेदी तातडीने सुरू करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.
पुढील काळात काय?
आवक आणखी वाढण्याची शक्यता असल्याने, जर मागणीत वाढ झाली नाही किंवा शासकीय खरेदीला गती मिळाली नाही, तर तुरीच्या दरांवर आणखी दबाव येण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Tur Market : नव्या वर्षाची सुरुवातच भाववाढीने; तूर हमीभाव गाठणार? वाचा सविस्तर
