Tur Market : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक चित्र समोर आले असून, ऐन काढणी हंगामाच्या तोंडावर बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवली जात आहे. (Tur Market)
जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये गुरुवारी तुरीचे दर साडे सात हजार रुपयांच्या पुढे गेल्याने यंदा तुरीचे दर हमीभावाचा टप्पा गाठण्याची शक्यता बळावली आहे.(Tur Market)
दर घसरणीनंतर बाजारात तेजी
यंदाच्या हंगामात तुरीची काढणी वेगात सुरू असली, तरी काही दिवसांपूर्वी तुरीच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले होते. आधीच अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले असताना, बाजारभावही कमी मिळत असल्याने उत्पादन खर्च निघेल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत होती. मात्र, नववर्षाच्या सुरुवातीलाच बाजारात सकारात्मक हालचाली दिसू लागल्या असून तुरीच्या दरात सुधारणा होत आहे.
सरासरी दर ६,५०० ते ७,२०० रुपयांवर
सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये तुरीचे सरासरी दर ६,५०० ते ७,२०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत. काही बाजारांमध्ये उच्चांकी दर ७,५०० रुपयांच्या पुढे पोहोचले असून, नवीन आवक सुरू असतानाही बाजारात तेजीचे वातावरण कायम आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कारंजा बाजार समितीत उच्चांकी दर
जिल्ह्यातील कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला सर्वाधिक दर मिळत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी येथे तुरीला कमाल ७,८७५ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. तर वाशिम बाजार समितीत कमाल ७,२०० रुपये प्रति क्विंटल दराची नोंद झाली. या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा विक्रीकडे कल वाढू लागला आहे.
आवकही वाढली
बाजारात नव्या तुरीची आवक वाढत असतानाच दरातही सुधारणा होत असल्याने शेतकरी तुरीच्या विक्रीसाठी बाजार समित्यांकडे वळत आहेत. परिणामी, तुरीची आवक लक्षणीयरीत्या वाढली आहे. गुरुवारी कारंजा बाजार समितीत १,५५० क्विंटल, तर वाशिम बाजार समितीत १,२०० क्विंटल तुरीची आवक झाली होती.
हमीभाव ८ हजार रुपये
शासनाने यंदा तुरीसाठी ८,००० रुपये प्रति क्विंटल इतका किमान आधारभूत किंमत (हमीभाव) जाहीर केला आहे. गतवर्षी हा हमीभाव ७,५०० रुपये होता. सध्या बाजारात तुरीची मागणी वाढत असल्याने येत्या काळात दर हमीभावाच्या आसपास किंवा त्यावर जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज बाजारतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला
दरवाढीचे संकेत सकारात्मक असले तरी शेतकऱ्यांनी घाईघाईने विक्री न करता बाजार समित्यांतील दरांचा अंदाज घेऊनच तूर विक्री करावी, असा सल्ला बाजारतज्ज्ञांनी दिला आहे. योग्य वेळी विक्री केल्यास शेतकऱ्यांना तुरीतून अपेक्षित लाभ मिळू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
