वाशिम : रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या खरीप हंगामातील नव्या तुरीची अधिकृतपणे आवक सुरू झाली. (Tur Market)
मुहूर्ताच्या खरेदीवर तुरीला समाधानकारक दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र प्रत्यक्षात नव्या तुरीला केवळ ७ हजार रुपये प्रती क्विंटल इतकाच दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.(Tur Market)
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सततच्या अतिवृष्टीने सोयाबीनसह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा तुरीच्या पिकावर केंद्रित होत्या. (Tur Market)
पावसाळ्यातील प्रतिकूल परिस्थितीतून वाचलेल्या तुरीला नंतर पोषक हवामान लाभल्याने उत्पादन बऱ्यापैकी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र बाजारात मिळणारे अल्पदर शेतकऱ्यांची चिंता वाढवणारे ठरत आहेत.(Tur Market)
बुधवारी रिसोड बाजार समितीत नव्या व जुन्या तुरीची मिळून एकूण १४० क्विंटल इतकीच आवक झाली. यामध्ये नव्या तुरीला कमाल ७ हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळाला, तर जुन्या तुरीची खरेदी केवळ ६ हजार ७५० रुपये प्रती क्विंटल दराने झाली. (Tur Market)
विशेष म्हणजे, गतवर्षी तुरीचा हमीभाव ७ हजार ५५० रुपये प्रती क्विंटल होता. तरीही सध्या जुन्या तुरीची खरेदी हमीभावापेक्षा सुमारे हजार रुपयांनी कमी दराने होत आहे. (Tur Market)
यंदा तुरीला ८ हजार रुपये हमीभाव
केंद्र शासनाने यंदाच्या हंगामासाठी तुरीला ८ हजार रुपये प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. मात्र शासकीय खरेदी अद्याप सुरू न झाल्याने बाजारात खासगी व्यापाऱ्यांकडून कमी दरात खरेदी होत असल्याची स्थिती आहे. शासकीय हमीभाव केंद्रे तातडीने सुरू करण्यात यावीत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
जिल्ह्यात तुरीच्या पेरणीत घट
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गत हंगामात वाशिम जिल्ह्यात ६६ हजार ४३६ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. यंदा कृषी विभागाने ६४ हजार ७६८ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात ६४ हजार २०२ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत २३४ हेक्टरने क्षेत्र घटले आहे.
अतिवृष्टीने आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तुरीकडून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच मिळालेल्या कमी दरांमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली असून, पुढील काळात दर वाढण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा सविस्तर :Chia Seed Market : बाजारात नवे ट्रेंड; चिया-आळीवला विक्रमी बाजारभाव वाचा सविस्तर
