- सुनील चरपे
नागपूर : म्यानमारच्या ‘लेमन’ तुरीचे दर भारतीय तुरीच्या तुलनेत अधिक असूनही दर्जा व चवीमुळे भारतीय व्यापारी या तुरीच्या आयातीला प्रथम पसंती देत आहे. या तुरीचे दर भारतात येईपर्यंत प्रतिक्विंटल ८,४०० ते ८,६०० रुपयांपर्यंत पाेहाेचतात. तुलनेत आफ्रिकन देशातील तुरीचे दर कमी असून, वाहतूक खर्च अधिक असल्याने ते प्रतिक्विंटल ६,५०० ते ६,९०० रुपयांपर्यंत जातात. आयातीमुळे भारतीय बाजारात सध्या तुरीचे दर एमएसपी (आठ हजार रुपये)च्या खाली आले आहेत.
यावर्षी म्यानमारमध्ये तीन लाख टन तुरीचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, यातील दाेन लाख टन तूर भारतात आयात केली जाणार आहे. म्यानमारच्या बाजारात तुरीचे दर ९०० ते ९१५ डाॅलर प्रति टन म्हणजेच ८,१९० ते ८,३२० प्रतिक्विंटल आहे. मुंबई किंवा चेन्नईच्या बंदरापर्यंत ३० ते ३५ डाॅलर प्रतिटन खर्च येताे. त्यामुळे भारतात येईपर्यंत या तुरीचे दर ९३० ते ९५० डाॅलर प्रतिटन म्हणजेच ८,४६० ते ८,६४० रुपये प्रतिक्विंटल हाेतात.
आफ्रिकन देशांमध्ये तुरीचे ७३० ते ७८० डाॅलर प्रतिटन म्हणजे ६,६४० ते ७,१०० रुपये प्रति क्विंटल आहेत. भारतात येईपर्यंत प्रतिटन ७० ते ८० डाॅलरचा खर्च येत असल्याने भारतात आल्यावर या तुरीचे दर ८१० ते ८५० डाॅलर प्रतिटन म्हणजेच ७,३७० ते ७,७३० रुपये प्रतिक्विंटल हाेतात. ऐन हंगामात तुरीची आयात केली जात असल्याने देशांतर्गत बाजारातील तुरीचे दर प्रतिक्विंटन ७,१०० ते ७,५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
आयातीचा द्वि-राष्ट्र करार
तुरीच्या आयातीसाठी २०१६ मध्ये भारताने मोझांबिकसाेबत पाच वर्षांचा पहिला करार केला होता. त्या कराराचे मे २०२१ मध्ये नूतनीकरण करण्यात आले. या करारानुसार मोझांबिकमधून भारतात दरवर्षी २ लाख टन तूर आयात केली जाते. म्यानमार, मलावी व टांझानियासाेबत मे २०२१ मध्ये करार केले असून, म्यानमारमधून दरवर्षी किमान एक लाख तर मलावीमधून ५० हजार टन तूर आयात केली जाते. हे सर्व करार ३१ मार्च २०२६ पर्यंत वैध असून, ही आयात शुल्कमुक्त आहे.
तुरीची उत्पादन व मागणी
भारतात तुरीचे उत्पादन सरासरी ३३ ते ३७ लाख टन हाेत असून, मागणी व वापर सरासरी ४४ ते ४५ लाख टन आहे. त्यामुळे ८ ते ११ लाख टनांची तूट ही आयातीतून भरून काढली जाते. केंद्र सरकार डाळवर्गीय पिकांचे उत्पादन वाढीच्या घाेषणा करीत असले तरी तुरीला उत्पादन खर्च भरून निघेल एवढाही दर मिळत नसल्याने तसेच हंगामात आयात करून दर पाडले जात असल्याने देशातील तुरीचे पेरणीक्षेत्र व उत्पादन घटत आहे.
