Tur Market : राज्यात तुरीचा हंगाम सुरू होण्याआधीच तुरीच्या दरावर संक्रांत आली असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आफ्रिकन देशांतून आयात होणारी तूर जी देशांतर्गत बाजारात 'लेमन' तूर म्हणून ओळखली जाते.(Tur Market)
यासह कर्नाटक राज्यातूनही मोठ्या प्रमाणावर तुरीची आवक सुरू झाल्याने बाजारात दरावर दबाव निर्माण झाला आहे. परिणामी यंदा ८ हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव असतानाही बाजारात तुरीला केवळ ६ हजार ५०० ते ७ हजार रुपयांदरम्यान दर मिळत आहे.(Tur Market)
वर्षभर हमीभाव मिळालाच नाही
गेल्या दोन वर्षांपासून तुरीच्या दरात प्रचंड चढउतार पाहायला मिळत आहेत. दोन वर्षांपूर्वी तुरीचा दर १२ हजार रुपयांपर्यंत पोहोचला होता.
गतवर्षी शासनाने ७ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला होता. यंदा त्यात ४५० रुपयांची वाढ करत हमीभाव ८ हजार रुपये निश्चित करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष बाजारात तुरीला आजतागायत हमीभावाचा लाभ मिळालेला नाही, ही शेतकऱ्यांसाठी मोठी शोकांतिका ठरत आहे.
सणासुदीतही दरात घसरण
सणासुदीच्या काळात डाळींची मागणी वाढते, असा नेहमीचा अनुभव असतानाही यंदा तुरीच्या दरात मात्र सातत्याने घसरण होत आहे. यामागे देशांतर्गत आणि परदेशी तुरीची वाढलेली आवक हे प्रमुख कारण असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
अतिवृष्टी, मर रोगाचा फटका
यावर्षी अनेक भागांत अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून तुरीवर मर रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. त्यामुळे काही भागांत तुरीची झाडे करपली असून उत्पादनावरही परिणाम झाला आहे. असे असतानाही दरात वाढ न झाल्याने शेतकऱ्यांची निराशा अधिक गडद झाली आहे.
दरवाढीबाबत अनिश्चितता
सध्या तुरीच्या दरात चढउतार सुरू असले तरी ठोस दरवाढीबाबत निश्चित काही सांगता येत नसल्याचे बाजार समितीचे अडते अमर बांबल यांनी सांगितले.
कर्नाटक तसेच आफ्रिकन देशांतील तुरीची देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असल्याने तुरीच्या दरावर दबाव कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हमीभावासाठी नाफेड खरेदीची मागणी
कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांसह बर्मा व आफ्रिकन देशांतून तुरीची आवक सुरू आहे. त्यामुळे सध्या तुरीला बाजारात उठाव नाही. अशीच परिस्थिती राहिल्यास येत्या महिनाभरात महाराष्ट्रातील तूरही मोठ्या प्रमाणावर बाजारात येणार आहे.
अशावेळी शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने नाफेडमार्फत हमीभावाने तूर खरेदी सुरू करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी व संघटनांकडून होत आहे.
वाटाण्यावरील आयात शुल्क माफीचा फटका
केंद्र शासनाने वाटाण्यावरील आयात शुल्क माफ केल्याचाही अप्रत्यक्ष फटका तुरीच्या दराला बसल्याचे व्यापारी सांगतात. लेमन तुरीचे दर सध्या ५ हजार ५०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.
हॉटेल आणि खाद्य व्यवसायात मोठ्या प्रमाणावर लेमन तुरीचा वापर होत असल्याने गावरान तुरीच्या मागणीत घट झाली आहे. विदर्भातच प्रामुख्याने गावरान तुरीचा वापर होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी नमूद केले.
तुरीचे अलीकडील बाजारभाव (रु. प्रति क्विंटल)
२२ डिसेंबर : ६,४०० ते ६,७००
२४ डिसेंबर : ६,४०० ते ६,८००
२६ डिसेंबर : ६,६५० ते ७,१००
२९ डिसेंबर : ६,६५० ते ७,०७२
३१ डिसेंबर : ६,५५० ते ६,९५०
२ जानेवारी : ६,६५० ते ६,९११
हंगाम तोंडावर, अडचणी वाढल्या
पुढील दोन महिन्यांत तुरीचा मुख्य हंगाम सुरू होणार आहे. सध्या पीक चांगल्या बहरात असल्याने शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. मात्र, दरातील सततची घसरण, आयात तुरीचा दबाव आणि हमीभावाचा अभाव यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत.
