Tur, Halad Market : हिंगोली जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरांनी गेल्या आठवडाभरात लक्षणीय उसळी घेतली असून, ऐन काढणीच्या काळात भाव वाढल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Tur, Halad Market)
दुसरीकडे मात्र हळदीच्या दरात घसरण नोंदवली जात असल्याने हळद उत्पादकांमध्ये काहीशी निराशा दिसून येत आहे.(Tur, Halad Market)
हिंगोली येथील मोंढ्यात सध्या तुरीची नव्या मालाची आवक सुरू झाली असून, दरातही सुधारणा होत आहे. १५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीने ७ हजार १०० रुपयांचा टप्पा गाठला, तर काही ठिकाणी चांगल्या दर्जाच्या तुरीला प्रतिक्विंटल ७ हजार ८०० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. सध्या बाजारात तुरीला सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. (Tur, Halad Market)
अतिवृष्टीचा फटका, दर घसरणीने वाढली होती चिंता
यंदाच्या हंगामात अतिवृष्टीमुळे तुरीच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी तुरीच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण होते.
उत्पादन खर्चही निघेल की नाही, अशी चिंता अनेक शेतकऱ्यांना सतावत होती. मात्र, नववर्षाच्या सुरुवातीलाच दरात सुधारणा होऊ लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मोंढ्यात वाढली तुरीची आवक
हिंगोलीच्या मोंढ्यात सध्या दररोज सरासरी २०० क्विंटल तुरीची आवक होत आहे. बाजारात तेजीचे वातावरण असून, शेतकरी तुरीच्या विक्रीकडे अधिक भर देताना दिसत आहेत.
सणासुदीच्या काळात तुरीची मागणी वाढल्याने भावात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
हळदीच्या दरात मात्र घसरण
तुरीच्या दरात सुधारणा होत असतानाच हळदीच्या दरात मात्र उलट चित्र पाहायला मिळत आहे. हळदीची आवक तुलनेने मंदावलेली असतानाही गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांची घसरण झाली आहे.
८ जानेवारी रोजी हळदीला प्रतिक्विंटल १५ हजार २०० ते १७ हजार ७०० रुपये भाव मिळत होता. मात्र, १३ जानेवारी रोजी हा भाव सरासरी १५ हजार ६०० रुपयांपर्यंत घसरल्याचे बाजार समितीच्या नोंदींवरून दिसून येते.
तुरीचा हमीभाव ८ हजार रुपये
शासनाने यंदा तुरीसाठी प्रतिक्विंटल ८ हजार रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मागील वर्षी हा हमीभाव ७ हजार ५०० रुपये होता.
सध्याची बाजारातील मागणी आणि दरातील तेजी पाहता, तुरीचे दर लवकरच हमीभावाच्या आसपास किंवा त्याहून अधिक पातळी गाठतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी बाजारातील परिस्थिती आणि दरांचा अंदाज घेऊनच तुरीची विक्री करावी, असा सल्लाही व्यापाऱ्यांकडून देण्यात येत आहे.
पुढील काळात दरवाढीची शक्यता
ऐन सणासुदीच्या काळात तुरीचे दर वधारल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पुढील काही दिवसांत आवक आणि मागणीचा समतोल राखला गेला, तर तुरीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा अंदाज बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
