Join us
Daily Top 2Weekly Top 5

Till Market : तिळाने गाठला विक्रमी दर; यवतमाळात प्रतिक्विंटल इतक्या हजारांचा टप्पा पार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 17:23 IST

Till Market : यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीत तिळाच्या दराने विक्रमी झेप घेतली असून प्रतिक्विंटल १० हजार १०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. खाद्य तेलाच्या वाढत्या किमती आणि बाहेर राज्यातील व्यापाऱ्यांच्या वाढलेल्या मागणीमुळे तिळाच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. (Till Market)

Till Market : खाद्य तेलाच्या सतत वाढत असलेल्या किमतींचा परिणाम आता तिळाच्या बाजारभावावरही दिसून येत आहे. (Till Market)

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीत तिळाला तब्बल १० हजार १०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.(Till Market)

राज्यातील इतर बाजारांच्या तुलनेत हा दर अधिक असल्याने जिल्ह्यातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणात तीळ विक्रीसाठी बाजारात येत आहे.

शुक्रवारी यवतमाळ बाजारात तिळाला ९ हजार २०० ते १० हजार १०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मागील आठ दिवसांपासून तिळाच्या दरात सातत्याने तेजी पाहायला मिळत असून, पुढील काही दिवस हे दर कायम राहण्याची शक्यता कृषी अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.

लागवड क्षेत्र घटल्याचा परिणाम

गतवर्षी तिळाला अपेक्षित दर मिळाला नव्हता. त्यामुळे यंदाच्या उन्हाळी हंगामात अनेक शेतकऱ्यांनी तिळाच्या लागवडीकडे पाठ फिरवली. परिणामी जिल्ह्यात केवळ सुमारे तीन हजार हेक्टरवर तिळाची लागवड झाली.

लागवड क्षेत्र घटल्यामुळे बाजारात तिळाची आवक कमी झाली आहे. दुसरीकडे खाद्य तेलाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने तिळाची मागणी वाढली आहे. या दोन्ही घटकांचा थेट परिणाम बाजारभावावर होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

बाहेर राज्यातील व्यापाऱ्यांची बाजारात एन्ट्री

यवतमाळ बाजारात तिळाच्या खरेदीसाठी बाहेर राज्यातील व्यापाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात प्रवेश केला आहे. त्यामुळे तिळाला चांगली मागणी निर्माण झाली असून, स्पर्धात्मक खरेदीमुळे दरात आणखी वाढ होत आहे.

संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी सध्या यवतमाळ बाजाराकडे वळताना दिसत आहेत. वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत असला तरी उत्पादन कमी असल्याने अनेक शेतकरी अपेक्षित प्रमाणात फायदा घेऊ शकत नसल्याची स्थिती आहे.

वादळी पावसामुळे पिकाचे नुकसान

यंदा काही शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात तिळाची लागवड केली होती. सध्या हे पीक काढणीच्या टप्प्यावर आले असतानाच अनेक भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू झाला आहे.

या पावसामुळे उभे असलेले तिळाचे पीक आडवे पडत असून, पिकाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

विशेषतः काढणीच्या टप्प्यावर असलेल्या पिकाला पावसाचा फटका बसल्यास शेतकऱ्यांचे नुकसान वाढू शकते.

शेतकऱ्यांचे लक्ष आता बाजारभावाकडे

सध्या तिळाच्या वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेक शेतकरी दर आणखी वाढतील या अपेक्षेने माल साठवून ठेवत आहेत. 

मात्र हवामानातील बदल आणि अवकाळी पावसाचा धोका लक्षात घेता शेतकरी सावध भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market Update : दर वाढले पण माल संपला; सोयाबीन बाजारात नेमकं काय घडलं?

अधिक वाचा : Cotton Market : कापसाने गाठली विक्रमी उंची; जाणून घ्या काय आहे कारण

English
हिंदी सारांश
Web Title : Yavatmal Sees Sesame Prices Soar to ₹10,100 Amidst Reduced Cultivation

Web Summary : Sesame prices in Yavatmal hit ₹10,100 due to rising oil prices and decreased cultivation. Increased demand from outside traders boosts the market. Recent storms threaten crop quality, potentially affecting yields. Farmers are benefiting from the high prices.
टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती