Soybean Seed Market : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (१६ डिसेंबर) रोजी सोयाबीनसह इतर प्रमुख शेतमालाच्या दरांमध्ये मर्यादित चढ-उतार पाहायला मिळाले. (Soybean Seed Market)
सोयाबीन सिड्सची आवक लक्षणीयरीत्या घटली असताना, साध्या सोयाबीनची आवक तुलनेने स्थिर राहिली. आवक कमी असल्याने सिड्स सोयाबीनला चांगला दर मिळाल्याचे चित्र आहे, तर इतर धान्यांच्या दरांमध्ये फारशी हालचाल दिसून आली नाही.(Soybean Seed Market)
सोमवारी बाजार समितीत सोयाबीन सिड्सची केवळ ६१ क्विंटल इतकीच आवक नोंदविण्यात आली. या सिड्स सोयाबीनला प्रतिक्विंटल कमाल ५,१७५ रुपये, सरासरी ५,१०० रुपये, तर किमान ५,०१५ रुपये दर मिळाला. मागील काही दिवसांच्या तुलनेत सिड्सची आवक कमी झाल्याने दरात किंचित सुधारणा झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.(Soybean Seed Market)
दरम्यान, सध्या सोयाबीनची आवक ३ हजार ६ क्विंटल इतकी झाली. या सोयाबीनला प्रतिक्विंटल कमाल ४ हजार ५५० रुपये, सरासरी ४ हजार ३९५ रुपये, तर किमान ४ हजार रुपये दर मिळाला. आवक मोठ्या प्रमाणात असली तरी मागणी आणि पुरवठा संतुलित असल्याने दरात फारसा बदल झाला नसल्याचे बाजार समितीतील सूत्रांनी स्पष्ट केले.(Soybean Seed Market)
तुरीला समाधानकारक भाव
बाजार समितीत तुरीची आवक ३०५ क्विंटल इतकी नोंद झाली. तुरीला प्रतिक्विंटल कमाल ७ हजार ८५ रुपये, सरासरी ६ हजार ८७५ रुपये, तर किमान ६ हजार २१० रुपये दर मिळाला. तुरीच्या दरात सध्या स्थिरता असून, दर्जेदार मालाला चांगला भाव मिळत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
हरभरा, तिळ व गहू
हरभऱ्याची आवक तुलनेने कमी राहिली असून केवळ १०० क्विंटल इतकी नोंद झाली. हरभऱ्याला प्रतिक्विंटल कमाल ५ हजार २५० रुपये, सरासरी ५ हजार २०० रुपये, तर किमान ५ हजार ३० रुपये दर मिळाला.
दरम्यान, तिळाची आवक अत्यल्प राहिली असून केवळ ७ क्विंटल इतकी नोंदविण्यात आली. मात्र, कमी आवकेमुळे दर समाधानकारक राहिले. तिळाला प्रतिक्विंटल कमाल १० हजार ४०० रुपये, सरासरी १० हजार १८७ रुपये, तर किमान ९ हजार ९७५ रुपये दर मिळाला. परिसरात यंदा तिळाचा पेरा घटल्यामुळे आवक नगण्य असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
लोकल गव्हाची आवकही अत्यल्प राहिली असून केवळ १४ क्विंटल इतकी झाली. गव्हाला प्रतिक्विंटल कमाल २ हजार ५२० रुपये, सरासरी २ हजार ५०० रुपये, तर किमान २ हजार ४८० रुपये दर मिळाला. याशिवाय लोकल ज्वारीची आवक केवळ १० क्विंटल इतकी नोंदविण्यात आली असून, ज्वारीला कमाल, किमान व सरासरी २ हजार २६५ रुपये दर मिळाला.
पुढील काळाकडे लक्ष
एकूणच अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनसह प्रमुख शेतमालाच्या दरांमध्ये मोठी उसळी किंवा घसरण नोंदविण्यात आलेली नाही. मात्र, आवक आणि मागणीच्या प्रमाणावरच पुढील काळात दर ठरणार असल्याचे बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले आहे. आगामी दिवसांत आवक वाढल्यास किंवा घटल्यास त्याचा थेट परिणाम दरांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा सविस्तर :Cotton Market : कापसाच्या दरांचे भवितव्य टांगणीला; काय आहे कारण वाचा सविस्तर
