Soybean Seed Market : वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या महिनाभरात विक्रमी पातळीवर पोहोचलेले बीजवाई दर्जाच्या सोयाबीनचे दर आता मात्र मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. (Soybean Seed Market)
२९ नोव्हेंबर रोजी प्रतिक्विंटल ८ हजार ५०० रुपये दर मिळालेल्या सोयाबीनचा भाव थेट १७ डिसेंबर रोजी ४ हजार ६१० रुपयांवर येऊन ठेपला आहे. अवघ्या १८ दिवसांत क्विंटलमागे सुमारे ३ हजार ९०० रुपयांची घसरण झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.(Soybean Seed Market)
वाशिम बाजार समितीत गेल्या दोन महिन्यांपासून बीजवाई दर्जाच्या सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक सुरू होती. (Soybean Seed Market)
नोव्हेंबरच्या अखेरीस मिळालेल्या उच्च दरामुळे वाशिम बाजार समितीची राज्यभर चर्चा झाली होती. परिणामी हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला आदी जिल्ह्यांतील शेतकरीही सोयाबीन विक्रीसाठी वाशिममध्ये दाखल झाले होते. त्या काळात बाजार समितीत विक्रमी आवक नोंदविण्यात आली होती.
दर घसरताच आवक कमी
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात वाशिम बाजार समितीत सोयाबीनची आवक ३० हजार क्विंटलपर्यंत पोहोचली होती. त्या वेळी दर समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली; मात्र डिसेंबरच्या सुरुवातीपासून दरात सातत्याने घसरण सुरू होताच आवकही घटू लागली आहे.
५ हजार ५०० क्विंटल आवक
अलीकडील दिवसांत बाजार समितीत सोयाबीनची आवक लक्षणीयरीत्या कमी झाली असून, मंगळवारी केवळ ५ हजार ५०० क्विंटल आवक नोंदविण्यात आली. दरातील घसरणीमुळे अनेक शेतकऱ्यांनी सध्या सोयाबीनची विक्री थांबवत प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे.
चढ-उतारामुळे शेतकरी संभ्रमात
बीजवाई सोयाबीनच्या दरात सातत्याने होत असलेल्या चढ-उतारामुळे शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. आवक वाढली की दर घसरतात आणि आवक कमी झाली की काही प्रमाणात दरात सुधारणा होते, असा कल सध्या बाजारात दिसून येत आहे. त्यामुळे दर पुन्हा वाढल्यानंतरच विक्री करावी, अशी भूमिका अनेक शेतकरी घेत असल्याचे बाजारात बोलले जात आहे.
बाजाराचा अंदाज घेऊनच विक्रीचा सल्ला
सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाईघाईने सोयाबीनची विक्री न करता बाजारातील मागणी, आवक आणि दरांचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा, असा सल्ला बाजारतज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.
आगामी काळात आवक आणखी घटल्यास दरात काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हे ही वाचा सविस्तर :Soybean Seed Market : सोयाबीन सिड्सची आवक घटली; दर सुधारले आहेत का? वाचा सविस्तर
