रूपेश उत्तरवार
राजस्थानातील एका विशिष्ट सोयाबीन जातीने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. साध्या सोयाबीनला सध्या ३ हजार ८०० ते ४ हजार ६०० रुपये दर मिळत असताना, या जातीला तब्बल ५ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपये क्विंटल दर मिळत आहे. (Soybean Seed Market)
या उच्च मागणीमुळे बियाणे कंपन्यांमध्ये खरेदीची चढाओढ सुरू झाली आहे. पावसाने अनेक सीड प्लॉट उद्ध्वस्त झाल्याने बाजारात बियाण्यांची टंचाई निर्माण झाली असून, शेतकऱ्यांचा कल या खास सोयाबीनकडे वेगाने वळतोय. (Soybean Seed Market)
सध्या बाजारात सोयाबीनला सरासरी ३,८०० ते ४,६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असताना, एका विशिष्ट जातीच्या सोयाबीनला तब्बल ५,५०० ते ७,५०० रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी दर मिळत आहे.
ही सोयाबीनची जात थेट राजस्थानातून महाराष्ट्रात आलेली असून, तिच्या मागणीमुळे बियाणे कंपन्यांमध्ये खरेदीची प्रचंड चढाओढ सुरू झाली आहे.
राजस्थानचे बियाणे ठरत आहेत 'हिट'
गेल्या तीन–चार वर्षांपासून विदर्भातील काही शेतकरी राजस्थानमधील खास जातीच्या सोयाबीनचा प्रयोग करत आहेत.
या जातीचे वैशिष्ट्य आहेत तरी काय?
* फुले पांढरी आणि शेंगांवर काळी रेषा
* रोगप्रतिकारक क्षमता जास्त
* उत्पादन कालावधी साधारण तसाच
* आणि व्हायरसचा कोणताही परिणाम नाही
यामुळे या जातीचे सोयाबीन शेतकऱ्यांना आवडू लागले आहे. परिणामी कारंजा आणि वाशिम बाजारपेठेत या विशिष्ट सोयाबीनची मोठी मागणी वाढली असून, दरही दिवसेंदिवस वर जात आहेत.
बियाणे कंपन्यांची धावपळ
राज्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीड प्लॉट (बीज उत्पादनासाठी ठेवलेली शेते) उद्ध्वस्त झाली आहेत. परिणामी अनेक बियाणे कंपन्यांकडे तयार बियाण्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे आता कंपन्यांनी बाजारातून थेट शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी सुरू केली आहे.
हे सोयाबीन चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवून, त्याच्या उगवण क्षमतेनुसार पुढील वर्षी बियाण्याच्या विक्रीसाठी तयार केले जाण्याची शक्यता आहे.
शेतकरी झाले 'कृषी संशोधक'
हवामानातील अस्थिरतेमुळे पारंपरिक वाणांवर मोठा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी स्वतः प्रयोग करून बदलत्या वातावरणात टिकणाऱ्या जाती शोधत आहेत. राजस्थानातील या सोयाबीन जातीने त्याचे उत्कृष्ट उदाहरण दिले आहे.
कृषी शास्त्रज्ञांनी या प्रयोगांचा अभ्यास करून स्थानिक परिस्थितीला सुसंगत बियाणे विकसित करणे आवश्यक असल्याचे मत कृषितज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
बाजारात नवा कल
या विशिष्ट जातीच्या सोयाबीनमुळे बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे.
सध्या सोयाबीनच्या तुलनेत दर जवळपास २,००० ते ३,००० ने जास्त मिळत असल्याने शेतकरी या बियाण्याकडे वळत आहेत. भविष्यात महाराष्ट्रातील खरीप हंगामात या जातीचा मोठ्या प्रमाणात विस्तार होण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन वर्षांत या राजस्थान बियाण्याने अतिवृष्टीतसुद्धा चांगले उत्पादन दिले. कीडरोगांचा त्रास कमी आणि शेंगा भरपूर. त्यामुळे पुढील हंगामातही हेच बियाणे लावणार असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
राज्यातील बियाणे उद्योगाला सध्या मोठी मागणी मिळत असली तरी उपलब्धतेचा तुटवडा निर्माण झाला आहे. बदलत्या हवामानात टिकणाऱ्या, उत्पादनक्षम आणि रोगप्रतिरोधक जातींना शेतकरी आता प्राधान्य देत आहेत आणि हेच भविष्यातील शेतीचे नवे चित्र ठरणार आहे.
हे ही वाचा सविस्तर : Soybean Market Update : सोयाबीनची विक्रमी आवक; बाजार समित्या फुल्ल वाचा सविस्तर
