Soybean Market : गेल्या काही वर्षांनंतर यंदा प्रथमच सोयाबीनच्या दरात लक्षणीय वाढ नोंदविण्यात येत असून, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला प्रतिक्विंटल ४ हजार ९०० रुपयांपर्यंत भाव मिळू लागला आहे.(Soybean Market)
मात्र, ही दरवाढ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरण्याऐवजी त्यांच्या वेदना अधिक तीव्र करणारी ठरत असल्याचे वास्तव समोर आले आहे. कारण, भाव वाढले असले तरी बहुतांश शेतकऱ्यांकडे आता विक्रीसाठी सोयाबीन शिल्लकच राहिलेले नाही.(Soybean Market)
काढणीच्या आणि आवक वाढीच्या काळात सोयाबीनचे दर अत्यल्प होते. आर्थिक अडचणी, कर्जफेड, बियाणे, खत, कीटकनाशके तसेच घरखर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना नाईलाजाने सोयाबीन ३ हजार ५०० ते ३ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकावे लागले. त्या काळात भाव टिकवून ठेवण्याची क्षमता किंवा साठवणूक करण्यासाठी आवश्यक आर्थिक भांडवल बहुतांश शेतकऱ्यांकडे नव्हते.(Soybean Market)
परिणामी, सध्याच्या वाढलेल्या दराचा लाभ घेणाऱ्यांमध्ये व्यापारी, साठेबाज तसेच काही मोजके मोठे उत्पादक हेच प्रमुख घटक असल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे. सध्या बाजारात येणारी आवकही प्रामुख्याने व्यापाऱ्यांकडील साठ्यातून होत असल्याचे व्यापारी व बाजार समिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.(Soybean Market)
शेतकऱ्यांकडे पुरेशी साठवणूक सुविधा, गोदामांची उपलब्धता आणि आर्थिक स्थैर्य नसल्यामुळे दरवाढीचा फायदा घेणे त्यांना शक्य होत नाही. ही परिस्थिती नवी नसून, दरवर्षीच शेतकऱ्यांना याच समस्येला सामोरे जावे लागत आहे.(Soybean Market)
'भाव वाढतो तेव्हा माल संपतो आणि माल असतो तेव्हा भाव पडतो' अशी व्यथा शेतकरी उघडपणे व्यक्त करीत आहेत.
ही समस्या केवळ बाजारभावापुरती मर्यादित नसून, ती धोरणात्मक अपयशाचे स्पष्ट द्योतक असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
सोयाबीनसारख्या महत्त्वाच्या पिकासाठी प्रभावी हमीभाव खरेदी, वेळेवर खरेदी केंद्रांची उपलब्धता, साठवणूक योजना, गोदामे आणि शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणाऱ्या योजना राबविणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
अन्यथा, सोयाबीनच्या दरातील वाढ दरवर्षी व्यापारी आणि साठेबाजांपुरतीच मर्यादित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरवाढीमुळे बाजारात चैतन्य निर्माण झाले असले, तरी शेतकऱ्यांच्या हातात सोयाबीन नसल्याने ही दरवाढ त्यांच्या दृष्टीने केवळ आकड्यांपुरतीच राहिली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची ही खरी शोकांतिका पुन्हा एकदा समोर आली आहे.
हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : सोयाबीन दरवाढीचा फायदा कुणाला? जाणून घ्या सविस्तर
