Soybean Market Update : खरीप हंगाम जवळ आला असतानाच शेतकरी वर्ग बाजारात आपला जुना शेतमाल विकण्यासाठी उतरलाय. यामुळे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढताना दिसत आहे. (Soybean Market Update)
याच दरम्यान, सीड क्वालिटी (Seed Quality) (बिजवाई) सोयाबीनला मागणी वाढली असून दरही उंचावले आहेत. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सीड क्वालिटी (Seed Quality) सोयाबीनला तब्बल ५ हजार १०० प्रती क्विंटलचा दर मिळाला. मात्र दुसरीकडे मील क्वालिटी सोयाबीनचे दर अजूनही स्थिरच आहेत.
हमीभावापेक्षा वर
* केंद्र सरकारने या वर्षासाठी सोयाबीनसाठी ४ हजार ८९२ प्रती क्विंटलचा हमीभाव जाहीर केला आहे. पण मील क्वालिटी सोयाबीनचे दर यंदा अनेकवेळा हमीभावाच्याही खाली गेले.
* फेब्रुवारी-मार्च महिन्यांत दरात थोडी सुधारणा झाली होती. तेव्हा काही ठिकाणी दर साडेचार हजारांवर पोहोचले होते. मात्र त्यानंतर बाजारात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली.
सीड क्वालिटीला मागणी का वाढली?
खरीप हंगाम सुरू होण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. बियाण्यांची मागणी वाढली आहे. परिणामी बिजवाई दर्जाच्या सोयाबीनची मागणी आणि किंमत दोन्ही वाढत आहे. वाशिममध्ये मिळालेला ५ हजार १०० रुपये दर म्हणजे यंदाच्या हंगामातील एक उच्चांकी दर मानला जातो. याशिवाय कारंजा बाजारातही बिजवाई सोयाबीनला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे समजते.
मील क्वालिटी अजूनही दबावात
दुसरीकडे, मील क्वालिटी सोयाबीनचे दर मात्र वाढताना दिसत नाहीत. याचे कारण म्हणजे प्रक्रिया उद्योगांकडून सध्या अजून पुरेशी मागणी नाही. वाशिम आणि कारंजा या दोन बाजार समित्यांमध्ये मिळून सुमारे ७ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यातील बहुतांश माल मील क्वालिटीचाच होता. मात्र दर अजूनही ४ हजार ३०० ते ४ हजार ५०० रुपये या दरम्यानच अडकलेले आहेत.
मील क्वालिटी दर वाढतील का?
* हंगामाचा शेवट जवळ येत असल्यामुळे सोयाबीनची बाजारातील आवक लवकरच कमी होईल. त्याचवेळी मिल उद्योगांची मागणी मात्र वाढू शकते. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत मील क्वालिटीच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
* सध्या खरीपाच्या पार्श्वभूमीवर सीड क्वालिटी सोयाबीनला चांगला दर मिळत असला तरी सर्वच शेतकऱ्यांना त्याचा फायदा नाही. मील क्वालिटी उत्पादक अजूनही दरवाढीसाठी प्रतीक्षेत आहेत. मात्र, पुढच्या काही आठवड्यांत परिस्थितीत बदल होण्याची आशा आहे.