प्रशांत तेलवाडकर
राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. मात्र, या परिस्थितीतही सोयाबीन दर्जेदार आणि भरगच्च दाण्याचे आले आहे. (Soybean Market Update)
चांगल्या गुणवत्तेमुळे शेतकऱ्यांना आधारभूत किंमत ५ हजार ३२८ रु. प्रति क्विंटल मिळण्याची अपेक्षा होती. परंतु सध्या बाजारात ३ हजार ते ४ हजार १०० प्रति क्विंटल एवढेच भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या कपाळावर चिंता स्पष्ट दिसत आहे.(Soybean Market Update)
दिवाळीचा सण जवळ आल्याने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक गरजेमुळे नाईलाजाने विक्री करावी लागते आहे, तरीही अपेक्षित दर न मिळाल्याने त्यांची निराशा वाढत आहे.(Soybean Market Update)
सोयाबीनची आवक वाढली; पण भाव घटला
जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठ दिवसांपासून दररोज २५० ते ३०० क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे.
सध्या बाजारात आलेल्या सोयाबीनचा ओलसरपणा १८ ते १९ टक्के आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या भाव ३ हजार ते ४ हजार १०० रु. प्रति क्विंटल मिळत आहेत.
दर्जेदार पिकं; पण भाव नाही
दोन एकरात घेतलेल्या पिकांपैकी २५ पोती विक्रीसाठी आणली. दर्जेदार सोयाबीन असूनही ३ हजार ९०० रु. भाव मिळाला. व्यापाऱ्यांकडून योग्य किंमत मिळत नाही.- शेख रफिक, शेतकरी
दिवाळीचा सण जवळ आल्याने खर्चासाठी विक्री करावीच लागली. घरात जास्त दिवस ठेवले तर वजन कमी होते. - भागूबाई पळसकर, शेतकरी
सप्टेंबरमधील पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला. जिथे दोन एकरात ४० ते ५० क्विंटल अपेक्षित होते, तिथे फक्त २० ते २५ क्विंटलच उत्पादन झाले.- बाबूलाल घनवत, शेतकरी
मोबाइलवर भाव ५ हजार ४०० दाखवला होता, पण बाजारात ३ हजार ९०० मिळाले. यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास डळमळीत होत आहे.- गब्बू राठोड, शेतकरी
शेतकऱ्यांचा प्रत्येक क्विंटलमागे सुमारे २ हजार ७०० ते २ हजार ८०० रु. खर्च येतो. त्यामुळे किमान ५ हजार रु. भाव मिळावा अशी अपेक्षा आहे, पण बाजारात तो मिळत नाही.- विक्रम साहुजी, खरेदीदार
सोयाबीनचा दर्जा चांगला आहे, पण बाजारात मागणी कमी असल्याने भाव स्थिर राहिले आहेत. पुढील काही दिवसांत दरात सुधारणा होऊ शकते.- हरीश पवार, अडत व्यापारी
अति पावसाचा परिणाम
खरीप हंगामात झालेल्या सलग अतिवृष्टीने सोयाबीन पिकांची काढणी उशिरा झाली. अनेक ठिकाणी शेंगा पिकल्या पण ओलसर झाल्याने दाणे सुकले नाहीत. त्यामुळे उत्पादनात घट झाली असून, शेतकऱ्यांना खर्च भरूनही परतावा मिळणे कठीण झाले आहे.
भाववाढीची शक्यता?
व्यापाऱ्यांच्या मते, “दिवाळीनंतर बाजारात आवक कमी झाली तर सोयाबीनचे दर वाढू शकतात.” मात्र, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी दरात सुधारणा होण्याची तत्काळ शक्यता कमीच असल्याचे त्यांनी सांगितले.