Soybean Market Update : वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा नव्या सोयाबीनची आवक सुरू होताच अपेक्षेपेक्षा कमी दर मिळाल्याने शेतकरी वर्ग नाराज झाला होता. मात्र शासनाने जाहीर केलेल्या हमीभावामुळे बाजारातील गणितच बदलून गेले आहे. (Soybean Market Update)
हमीभावाने 'नाफेड'मार्फत खरेदी सुरू होताच खासगी व्यापाऱ्यांनी दर वाढवण्यास सुरुवात केली असून, गेल्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. (Soybean Market Update)
१७ डिसेंबरपर्यंत बाजार समितीत सोयाबीनला प्रतिक्विंटल साधारणतः ३ हजार ९१५ ते ४ हजार ३७५ रुपये इतकाच दर मिळत होता. मात्र, शासनाचा हमीभाव हा बाजारभावापेक्षा सुमारे १ हजार ४०० रुपयांनी अधिक असल्याने शेतकऱ्यांनी थेट नाफेडच्या खरेदी केंद्रांकडे मोर्चा वळवला. (Soybean Market Update)
ही परिस्थिती लक्षात येताच व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि बाजारातील दर वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. (Soybean Market Update)
'नाफेड'मुळे व्यापाऱ्यांवर दबाव
'नाफेड'मार्फत हमीभावाने खरेदी सुरू झाल्याने बाजार समित्यांमधील आवक घटण्याची भीती व्यापाऱ्यांना सतावू लागली आहे. शेतकऱ्यांचा माल थेट नाफेडकडे गेला, तर खुल्या बाजारात आवक कमी होईल, या धास्तीने व्यापाऱ्यांनी सोयाबीनच्या दरात वाढ करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. परिणामी शेतकऱ्यांना खुल्या बाजारातही चांगला दर मिळू लागला आहे.
दराचा खेळ रंगात; शेतकऱ्यांकडे पर्याय
हमीभाव आणि खुल्या बाजारातील वाढते दर असे दोन पर्याय सध्या शेतकऱ्यांसमोर उपलब्ध झाले आहेत. तातडीच्या रोख पैशाची गरज असलेले शेतकरी बाजार समितीत माल विक्रीला प्राधान्य देत आहेत, तर काही शेतकरी नाफेडकडे हमीभावाने माल देण्याचा निर्णय घेत आहेत.
या परिस्थितीमुळे सोयाबीन बाजारात दराचा खेळ रंगत असून, पुढील काळात दर आणखी वाढतात की स्थिरावतात, याकडे शेतकरी व व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सोयाबीन दरातील चढ-उतार (प्रतिक्विंटल)
१७ डिसेंबर : ३,९१५ – ४,३७५ रुपये
१८ डिसेंबर : ४,०१५ – ४,५८५ रुपये
१९ डिसेंबर : ३,९०५ – ४,५३५ रुपये
२२ डिसेंबर : ४,१०५ – ४,६५० रुपये
२३ डिसेंबर : ४,१२५ – ४,६४५ रुपये
२४ डिसेंबर : ४,१०५ – ४,७०० रुपये
या आकडेवारीवरून काही दिवसांतच सोयाबीनच्या दरात लक्षणीय सुधारणा झाल्याचे स्पष्ट होत आहे.
हमीभावामुळे बदलले बाजाराचे गणित
यंदा शासनाने सोयाबीनसाठी जाहीर केलेला हमीभाव बाजारातील सध्याच्या दरापेक्षा सुमारे १ हजार ४०० रुपयांनी अधिक आहे. त्यामुळे खुल्या बाजारात अपेक्षित दर न मिळाल्यास शेतकरी थेट नाफेडच्या खरेदी केंद्रांकडे वळत आहेत. या पर्यायामुळे शेतकऱ्यांची सौदेबाजीची ताकद वाढली असून, व्यापाऱ्यांना दर वाढवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
शेतकऱ्यांचा माल बाजारात यावा, यासाठी दरात सुधारणा करण्यात आली आहे. चांगल्या दर्जाच्या मालाला अधिक दर दिला जात आहे.- सुरेश भोयर, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन, बाजार समिती वाशिम
पुढील काळात काय?
नाफेडची खरेदी आणि खुल्या बाजारातील वाढते दर पाहता सोयाबीन बाजारात पुढील काही दिवस चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तरी दरवाढीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, नाफेडच्या हमीभावामुळे बाजारावर दबाव कायम असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
