Soybean Market : वाशिम जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मिल क्वॉलिटी सोयाबीनच्या दरात गेल्या आठवड्याभरात लक्षणीय तेजी पाहायला मिळत आहे. सध्या या सोयाबीनला ४ हजार ६०० ते ४ हजार ७९० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे.(Soybean Market)
आठवड्यापूर्वी हेच दर ४ हजार ३०० ते ४ हजार ४०० रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.(Soybean Market)
वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सुमारे ८ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. येथे मिल क्वॉलिटी सोयाबीनला ४ हजार ७९० रुपये प्रति क्विंटल असा जिल्ह्यातील सर्वाधिक भाव मिळाला. त्यापाठोपाठ वाशिम बाजार समितीत ४ हजार ७५५ रुपये, तर मंगरुळपीर बाजार समितीतही ४ हजार ७५५ रुपये प्रति क्विंटल असा कमाल दर नोंदविण्यात आला.(Soybean Market)
रिसोड, मालेगाव आणि मानोरा या बाजार समित्यांमध्येही सोयाबीनला समाधानकारक दर मिळत असून, रिसोडमध्ये कमाल दर ४ हजार ६३० रुपये प्रति क्विंटल इतका राहिला.
दरवाढीची तीन प्रमुख कारणे
बाजार तज्ज्ञांच्या मते, सध्या सोयाबीनच्या दरात तेजी येण्यामागे तीन महत्त्वाची कारणे आहेत.
* अमेरिका आणि ब्राझील या सोयाबीनच्या प्रमुख उत्पादक देशांमध्ये यंदा उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
* सोयाबीन डीओसी (डी-ऑईल्ड केक) ला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढली आहे.
* नाफेडमार्फत हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आल्याने बाजार समित्यांमधील सोयाबीनची आवक काही प्रमाणात घटली आहे. या तिन्ही घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून सोयाबीनच्या दरात तेजी दिसून येत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांचा सावध पवित्रा
दरात वाढ होत असली तरी अनेक शेतकरी पुढील काळात आणखी भाव वाढीच्या अपेक्षेने माल विक्रीबाबत सावध भूमिका घेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक कमी-अधिक प्रमाणात होत आहे.
सध्या प्रक्रिया उद्योगांकडून मागणी कायम असल्याने दरवाढीस पोषक वातावरण असल्याचे बाजार जाणकारांचे मत आहे.
पुढील काळाचा अंदाज
सद्यस्थिती लक्षात घेता, मकर संक्रांतीपर्यंत सोयाबीनचे दर ५ हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठू शकतात, असा अंदाज बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, सरकारी धोरणे आणि नाफेड खरेदीची पुढील दिशा यावर दरवाढीचा वेग अवलंबून राहणार आहे.
