Soybean Market : जागतिक बाजारातसोयाबीनच्या ढेपीच्या (Soybean Meal) निर्यातीला सकारात्मक चालना मिळाल्याचे संकेत मिळत आहेत.
मागील वर्षाच्या तुलनेत ढेपीच्या निर्यातीत वाढ झाल्याने देशांतर्गत बाजारातसोयाबीनच्या दरांना काही प्रमाणात आधार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जर ही निर्यात पुढील काळातही कायम राहिली, तर सोयाबीनच्या दरात हळूहळू सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापारी व बाजार अभ्यासक व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी सध्या सोयाबीन विक्री थांबवून दरवाढीची प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात खुल्या बाजारात सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने शेतकरी वर्गाने सध्या सोयाबीन विक्रीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
सध्याचे बाजारभाव उत्पादन खर्चालाही परवडणारे नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला असून, दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकरी थांबले आहेत. परिणामी बाजारपेठेत सोयाबीनची आवक लक्षणीयरीत्या घटली असून, ठिकठिकाणी शुकशुकाट जाणवत आहे.
जिल्ह्यात यंदा सोयाबीनचे लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असले, तरी हंगामाच्या सुरुवातीपासूनच अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सुरुवातीला विक्री रोखून धरली होती; मात्र दरात घसरण होताच बाजारात आणले जाणारे सोयाबीन आणखी कमी झाले आहे.
डॅमेज सोयाबीनच बाजारात
खुल्या बाजारात सध्या ३ हजार ६०० ते ४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल इतके दर मिळत असून, हा दर शेतकऱ्यांच्या मते लागवड खर्चालाही न परवडणारा आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीचे सोयाबीन शेतकरी घरीच ठेवत असून, डॅमेज किंवा कमी प्रतीचे सोयाबीनच विक्रीसाठी बाजारात आणले जात आहे. परिणामी बाजारातील सरासरी दरावरही त्याचा परिणाम होत असल्याचे व्यापारी सांगतात.
हमी केंद्रांकडे मोर्चा
दर घसरणीच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा शासनाच्या हमीभाव (MSP) खरेदी केंद्रांकडे वळविला आहे. मात्र, हमी केंद्रांवर केवळ चांगल्या दर्जाच्या सोयाबीनचीच खरेदी केली जात असल्याने कमी प्रतीच्या शेतमालाबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.
ढेप निर्यातीचा सकारात्मक संकेत
जागतिक बाजारात सोयाबीनच्या ढेपीची (Soybean Meal) मागणी आणि निर्यात गतवर्षीच्या तुलनेत वाढल्याचे संकेत आहेत. ही निर्यात पुढील काळातही वाढत राहिल्यास देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता शेतकरी व व्यापारी व्यक्त करीत आहेत. या अपेक्षेमुळेच अनेक शेतकऱ्यांनी सध्या सोयाबीन विक्री थांबविली आहे.
'सर्वच गुणवत्तेचे सोयाबीन घ्या' – शेतकऱ्यांची मागणी
हमी केंद्रांवर फक्त चांगल्या दर्जाचे सोयाबीन स्वीकारले जात असल्याने कमी प्रतीच्या किंवा डॅमेज सोयाबीनचे काय करायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे सर्वच गुणवत्तेचे सोयाबीन खरेदी करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून जोर धरत आहे. मात्र या मागणीवर अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
खरेदी केंद्रांवर तणावपूर्ण वातावरण
केवळ दर्जेदार सोयाबीन घेण्याच्या शासनाच्या सूचनांमुळे अनेक ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्रांवर तणावपूर्ण, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. काही शेतकरी कमी प्रतीचे सोयाबीन केंद्रात आणत असून, ते स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर केंद्र चालक आणि शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी होत असल्याच्या घटना घडत आहेत. या परिस्थितीत खरेदी केंद्र चालविणे केंद्र चालकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
दरवाढीचे संकेत खरे ठरले तर पुढील काही दिवसांत सोयाबीनची आवक पुन्हा वाढण्याची शक्यता आहे; मात्र तोपर्यंत बाजारपेठेत अनिश्चिततेचे वातावरण कायम राहणार असल्याचे चित्र आहे.
हे ही वाचा सविस्तर : Jowar Market : लागवड खर्चही वसूल होईना; खरीप ज्वारीचे दर नीचांकावर
