Soybean Market : शेतकऱ्याच्या मालाला तेव्हाच भाव मिळतो, जेव्हा त्याच्याकडे विकायला काहीच उरत नाही. ही कटू वस्तुस्थिती यंदाच्या हंगामात पुन्हा एकदा समोर आली आहे. (Soybean Market)
साठवणुकीच्या सुविधांचा अभाव आणि आर्थिक अडचणींमुळे मानोरा तालुक्यातील ३ हजार ५३३ शेतकऱ्यांनी तब्बल ४० हजार ५७५ क्विंटल सोयाबीन कमी दराने विकले. त्यानंतरच बाजारात दरवाढ सुरू झाली; मात्र या वाढीचा थेट फायदा शेतकऱ्यांना नव्हे तर व्यापाऱ्यांनाच मिळताना दिसत आहे.(Soybean Market)
यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीनला अपेक्षित भाव मिळाला नाही. अनेक बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी सुरू होती.
कर्जफेड, घरखर्च आणि रब्बी हंगामातील पिकांची तयारी या आर्थिक निकडींमुळे शेतकऱ्यांनी नाइलाजाने उपलब्ध बाजारभावातच सोयाबीनची विक्री केली. त्या काळात ४ हजार ते ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दराने व्यवहार झाले.
मात्र आता परिस्थिती बदलली असून सोयाबीनच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या बाजारात ४ हजार ८०० ते ४ हजार ९५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहेत.
म्हणजेच अवघ्या काही आठवड्यांत प्रतिक्विंटल ८०० ते ९०० रुपयांची वाढ झाली आहे. दुर्दैवाने, बहुसंख्य शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी माल शिल्लक नसल्याने या दरवाढीचा लाभ घेणे त्यांना शक्य राहिलेले नाही.
व्यापारी मालामाल; शेतकरी हवालदिल
शेतकऱ्यांनी माल विकून मोकळे होताच बाजारातील दरांचे चित्र झपाट्याने बदलले. कमी दरात मोठ्या प्रमाणात खरेदी केलेला सोयाबीन आता व्यापाऱ्यांच्या गोदामात असून तोच माल चढ्या भावात विकला जाणार आहे.
परिणामी व्यापाऱ्यांचे खिसे गरम होत असताना, रात्रंदिवस मेहनत करणारा शेतकरी मात्र आर्थिक नुकसानीत सापडला आहे.
माल शेतकऱ्यांच्या घरात असताना भाव पडलेले होते आणि तो व्यापाऱ्यांच्या गोदामात गेल्यावर भाव वाढले, अशी संतप्त भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
आकडेवारी काय सांगते?
सोयाबीन विक्री करणारे शेतकरी : ३,५३३
एकूण विक्री : ४०,५७५ क्विंटल
प्रतिक्विंटल दरवाढ : ८०० ते ९०० रुपये
अंदाजे एकूण नुकसान : ५ कोटी २७ लाख ४७ हजार ५०० रुपये
साठवणूक क्षमतेचा अभाव ठरला नुकसानदायक
शेतकऱ्यांकडे पुरेशी साठवणूक सुविधा उपलब्ध असती किंवा सुरुवातीलाच प्रभावी हमीभावाने खरेदी झाली असती, तर आर्थिक अडचणी असूनही शेतकऱ्यांनी माल साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला असता, अशी भावना व्यक्त होत आहे.
साठवणूक व्यवस्था, गोदामांची कमतरता आणि हमीभाव खरेदीतील मर्यादा यामुळे शेतकरी दरवाढीपासून वंचित राहिला आहे.
ही परिस्थिती म्हणजे व्यवस्थेचे अपयश असल्याची तीव्र प्रतिक्रिया तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत.
शेतकऱ्याला योग्य वेळी योग्य दर मिळावा यासाठी साठवणूक सुविधा वाढवणे, बाजार हस्तक्षेप प्रभावी करणे आणि हमीभावाची अंमलबजावणी काटेकोर करणे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
