अमरावती : शेतकऱ्यांजवळ फारसे सोयाबीन नाही व त्यातही नाफेड विक्रीकडे कल असल्याने बाजार समित्यांमध्ये आवक कमी झालेली आहे. अशा परिस्थितीत 'डीओसी'ची मागणी वाढली, शिवाय कापसावर आयात शुल्क लागू झाल्यानंतर सरकी देखील महागली. त्यामुळे सोयाबीनला उठाव आला व पहिल्यांदा दर ४९०० रुपये क्विंटलवर पोहोचले आहे.
येथील बाजार समितीमध्ये शनिवारी सोयाबीनला प्रति क्विंटल ४५०० ते ४९०० रुपयांदरम्यान भाव मिळाला आहे, गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरवाढीचा सकारात्मक कल दिसून येत आहे. काही दिवसांपासून स्थिर असलेले दर अचानक वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या दरवाढीमागे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक घटक कारणीभूत ठरले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी हा महत्त्वाचा घटक मानला जात आहे. अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिना या प्रमुख सोयाबीन उत्पादक देशांमध्ये हवामानातील बदल, उत्पादन अंदाजात घट आणि निर्यातीवरील मर्यादा यामुळे जागतिक बाजारात दर वाढले आहेत. याचा थेट परिणाम भारतीय बाजारावरही झाला असून आयात-निर्यात समतोल बदलल्याने देशांतर्गत दरांना आधार मिळाला आहे. स्थानिक पुरवठ्यात घट झालेली आहे.
तेल उद्योगांकडून मागणी वाढली
खाद्यतेलाच्या दरांमध्ये चढ-उतार सुरू असताना सोयाबीन तेलाची मागणी वाढली आहे. तेल गिरण्या आणि प्रक्रिया उद्योगांनी कच्च्या मालासाठी अधिक खरेदी सुरू केल्याने बाजारात स्पर्धा वाढली आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे. याशिवाय किमान आधारभूत किमतीनुसार शासन खरेदी सध्या सुरू असल्याचाही अप्रत्यक्ष परिणाम दिसून येत आहे.
म्हणून वाढले दर
अनेक शेतकऱ्यांनी गेल्या काही आठवड्यांत कमी भावामुळे सोयाबीनची विक्री रोखून धरली होती. आता बाजारात आवक मर्यादित राहिल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला आणि दर वाढले.
सोयाबीनचे बाजारभाव
३१ डिसेंबर - ४ हजार २५० रुपये ते ४ हजार ७५० रुपये, २ जानेवारी - ४ हजार ३०० रुपये ते ४ हजार ७५० रुपये, ५ जानेवारी - ४ हजार ३०० ते ४ हजार ७५० रुपये, ७ जानेवारी - ४ हजार ४०० रुपये ते ४ हजार ८०० रुपये, ९ जानेवारी - ४ हजार ५५० रुपये ते ४ हजार ९०० रुपये दर मिळाला.
