Soyabean Market : सन २०२५-२६ हंगामासाठी किमान आधारभूत किंमत ५ हजार ३२८ रुपये प्रति क्विंटल आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किंमती कमी आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पावसाने शेतीचं नुकसान केलं असताना दुसरीकडे पिकाला देखील अपेक्षित भाव नसल्याचे चित्र आहे.
आता सोयाबीनचे बाजारभाव पाहिले मागील तीन वर्षांत सरासरी ५ हजार रुपयांपर्यत दर मिळाले आहेत. मात्र यंदा अशी परिस्थिती नाही. मागील तीन वर्षातील नोव्हेंबर महिन्यातील सरासरी किंमती पाहिल्या तर नोव्हेंबर २०२२ मध्ये ५ हजार ६४७ रुपये प्रति क्विंटल, नोव्हेंबर २०२३ मध्ये ५ हजार २३ रुपये प्रति क्विंटल नोव्हेंबर २०२४ मध्ये ४ हजार २०८ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.
तर यंदाच्या नोव्हेंबर २०२५ मध्ये ४०२५ रुपये ते ४ हजार ३९० रुपये प्रति क्विंटल दर मिळण्याची शक्यता आहे. हा सदर संभाव्य किंमत अंदाज हा FAQ ग्रेडच्या सोयाबीनसाठी आहे. सन २०२४-२५ मध्ये सोयामीलच्या निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. सन २०२३-२०२४ मध्ये १९.७ लाख टन सोयापेंड निर्यात झाली आहे. सन २०२४-२५ मध्ये निर्यात १८.० लाख टन असून ती मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे.
सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचे तेलबिया पिक आहे. अमेरिका. ब्राझील, आर्जेन्टिना, चीन व भारत या देशात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. या प्रमुख देशातून जागतिक उत्पादनाच्या सुमारे ९० टक्के सोयाबीनचे उत्पादन होते.
त्यामुळे या देशातील सोयाबीनची मागणी, पुरवठा व उपभोग या घटकामध्ये होणाऱ्या बदलाचा सोयाबीनच्या किमतीवर परिणाम होत असतो. भारतात सन २०२५-२६ मध्ये सोयाबीनचे उत्पादन ११६ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत ८ टक्क्यांनी कमी आहे.
