नाशिक : देवळा येथील शांताराम आहेर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या वतीने भरडधान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला. मात्र पहिल्याच दिवशी केंद्रावर विक्रीसाठी सोयाबीन घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या गुणवत्ता नियंत्रक अटींचा फटका बसला.
शेतकऱ्यांनी आणलेले सोयाबीन स्वच्छता तपासणीत पास न झाल्यामुळे विक्रीसाठी आलेले सर्व २२० क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांना परत न्यावे लागले. जाचक अटींमुळे आल्या पावली जावे लागल्याने शेतकऱ्यांनी शासनाप्रती रोष व्यक्त केला.
यावेळी मटाणे येथील शेतकरी दत्तात्रेय आहेर यांच्या सोयाबीन खरेदीने योजनेचा शुभारंभ झाला. सदर योजनेंतर्गत नोंदणीकृत विक्रीसाठी आलेल्या मका २४०० रुपये, तर सोयाबीन ५ हजार ३२८ रुपये प्रति क्विंटल या आधारभूत किमती प्रमाणे खरेदी केली जात आहे. दरम्यान, आतापर्यंत तालुक्यातील १ हजार १६ शेतकऱ्यांनी मका नोंदणी केली, तर ८ शेतकऱ्यांनी सोयाबीनची नोंदणी केली आहे.
....असे आहेत निकष
केंद्र शासनाने विहित केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त आर्द्रता असलेला, जास्त ओलसर किंवा बुरशीयुक्त भरडधान्य खरेदी करू नये. भरडधान्य स्वच्छ व कोरडे असून ते विक्री योग्य (मार्केटेबल) असल्याची खातरजमा करावी असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. विहीत प्रमाणापेक्षा जास्त आर्द्रता असलेले भरडधान्य खरेदी केल्यास त्या संस्थेवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे.
देवळा येथे खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून शासकीय आधारभूत किमतीत मका, सोयाबीन खरेदी चालू झाली असून ३१ डिसेंबर अखेरपर्यंत नोंदणी केलेला सर्व मका खरेदी केला जाईल. यंदा ५० हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांनी दर्जेदार, स्वच्छ व कोरडा माल आणावा.
- संजय गायकवाड, अध्यक्ष, खरेदी विक्री संघ, देवळा.
