जळगाव : जिल्ह्याची ओळख असलेल्या केळीने आता जागतिक स्तरावर आपला 'ब्रँड' प्रस्थापित केला आहे. उत्तम चव आणि दीर्घकाळ टिकण्याची क्षमता असलेल्या येथील 'जी-नाईन' केळीला आखाती देशांनी डोक्यावर घेतले असून, २०२५ या वर्षात जिल्ह्यातून तब्बल १० हजार कंटेनर्सची विक्रमी निर्यात झाली आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत निर्यातीचा हा आकडा दुपटीपेक्षा अधिक असल्याने जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळाली आहे. जिल्ह्यातून होणारी ही निर्यात प्रामुख्याने इराण, सौदी अरेबिया, दुबई, ओमान, कतार, इजिप्त आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये होते.
२०२४ मध्ये जिल्ह्यातून साधारण ३,५०० कंटेनर निर्यात झाले होते. मात्र, २०२५ मध्ये हा आकडा १० हजारांच्या पार गेले आहे. विशेषतः रावेर आणि यावल या तालुक्यांसह चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर, भडगाव, जळगाव या तालुक्यांमध्ये ही निर्यात झाली आहे.
निर्यात वाढण्याची कारणं..
जिल्ह्यात आतापर्यंत केवळ वर्षभरातील ठरावीक महिन्यांमध्येच केळीची कापणी केली जात होती, त्यामुळे ठरावीक महिन्यांमध्येच केळीचा हंगाम होत होता, त्यातही अनेक शेतकऱ्यांचा भर हा स्थानिक बाजारातच केळी देण्यावर होता. मात्र, आता जिल्ह्यात वर्षभर केळीची उपलब्धता वाढली आहे.
त्यात केळी उत्पादक आता केवळ स्थानिक बाजारावर अवलंबून न राहता बाहेर देशात निर्यातीवर भर देऊ लागले आहेत, अशी माहिती रावेर येथील प्रगतिशील केळी उत्पादक शेतकरी विशाल अग्रवाल यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
निर्यातीला बळ देणारे महत्त्वाचे घटक
'किसान रेल'चा आधार : केळी वेळेत आणि कमी खर्चात बंदरांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'किसान रेल' अत्यंत फायदेशीर ठरली आहे.
आधुनिक पॅकिंग हाऊस : जिल्ह्यात नवीन पॅकिंग हाऊस उभारल्याने केळीची हाताळणी सुधारली आहे. यामुळे परदेशात माल नाकारला जाण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे.
जी-नाईन टिश्युकल्चर : जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरपैकी ८० टक्के क्षेत्रावर निर्यातक्षम जी-नाईन केळीची लागवड होते, जी आखाती देशांच्या निकषांवर पात्र ठरत आहे.
