Pulses Market : राज्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांची शेती अक्षरशः खरडून टाकली आहे. खरीप हंगामातील कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाल्याने उत्पादन घटले असून, आगामी काही दिवसांत मूग, उडीद, हरभरा आणि मटकीच्या दरांचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.(Pulses Market)
अतिवृष्टीचा फटका कडधान्य पिकांना
हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक भागांत सप्टेंबरअखेर झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील पिके वाहून गेली. विशेषतः मूग, उडीद आणि तूर पिके पूर्णपणे मातीने गाडली गेली किंवा शेंगा मोडून जागेवरच खराब झाल्या.(Pulses Market)
पोळ्यानंतर पावसाने जोर पकडल्याने तोडणीस आलेली कडधान्य पिके वाहून गेली. काही शेतात माती, दगड, गोटेच उरले असल्याचे स्थानिक शेतकरी सांगतात.
या पिकांचे नुकसान झाल्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून, बाजारात डाळींची आवक कमी होत आहे.
कडधान्य दरवाढीची चिन्हे
बाजार समित्यांमध्ये सध्या कडधान्याचे दर वाढू लागले आहेत.
मूग : ८० ते ₹१०० रु.किलो
उडीद : १०५ रु.किलोपर्यंत
मटकी : ९० ते १०५ रु. किलो
गेल्या वर्षीच्या तुलनेत मटकीच्या दरात २५–३० टक्के वाढ झाली आहे. मटकीला सर्वाधिक दर मिळत असून, व्यापाऱ्यांच्या मते, आवक कमी झाल्याने पुढील आठवड्यांत दर आणखी वाढू शकतात.
मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचा बळी गेला आहे. रब्बी हंगामासाठीही जमीन तयार झालेली नाही. त्यामुळे डाळींचा तुटवडा वाढणार आहे.- विजय जैन, व्यापारी, हिंगोली.
रब्बी हंगामालाही फटका
हिंगोली, सेनगाव आणि कळमनुरी तालुक्यांत खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात कडधान्यांची पेरणी होते. मात्र, अतिवृष्टीमुळे जमीन वाहून गेल्याने शेतं तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी रब्बी हंगामातील हरभरा आणि मसूर पिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.
याशिवाय कर्नाटक आणि मराठवाडा भागातून डाळींचा पुरवठा होत असला, तरी तेथेही पावसाने नुकसान केल्यामुळे बाजारातील उपलब्धता कमी होऊन दरात झपाट्याने वाढ होईल, अशी शक्यता आहे.
शेतकरी आणि ग्राहक दोघेही अडचणीत
शेतकऱ्यांना उत्पादन घट आणि जमिनीच्या हानीचा फटका बसला आहे.
तर ग्राहकांना महागाईचा तडाखा बसणार आहे.
अन्नधान्य आणि कडधान्याचे दर वाढल्याने स्वयंपाकघराचा खर्च वाढेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सरकार आणि प्रशासनासाठी आव्हान
हवामानातील या बदलामुळे राज्यातील कृषी विभागावर मोठं आव्हान उभे राहिले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असली तरी पिकांची हानी आणि भाववाढ रोखण्यासाठी ठोस धोरणाची गरज आहे.
अतिवृष्टीने राज्यातील कडधान्य पिकांचे नुकसान झाले असून, बाजारात डाळींची आवक कमी झाली आहे. परिणामी, मूग, उडीद, मटकी आणि हरभरा यांच्या दरांचा भडका उडण्याची शक्यता वाढली आहे. शेतकऱ्यांसाठी हा हंगाम तोट्याचा ठरत असतानाच ग्राहकांनाही वाढत्या महागाईचा सामना करावा लागणार आहे.
हे ही वाचा सविस्तर : Tur Market Update : तुरीच्या भावात तेजी; पण हमीदरापेक्षा कमीच! वाचा सविस्तर