Join us

एकट्या लासलगावात कांदा किती घसरला? मार्चचा पहिला आणि शेवटचा आठवडा कसा राहिला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 14:29 IST

एकट्या लासलगाव बाजार समितीचा विचार केला तर कांदा दरात कमालीची घसरण पाहायला मिळाली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात सातत्याने घसरण सुरूच असून आता केंद्र सरकारनेकांदा निर्यात बंदी पुढील आदेश येईपर्यंत सुरू असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच नाराज असल्याचे चित्र आहे. मागील आठवडाभरात जवळपास पाचशे ते सहाशे रुपयांची घसरण झाली आहे. एकट्या लासलगाव बाजार समितीचा विचार केला तर कांदा दरात कमालीची घसरण पाहायला मिळाली आहे. 

मार्चच्या पहिल्या आठवडाभर कांद्याला समाधानकारक भाव मिळत होता. लासलगाव बाजार समितीचा विचार केला तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात लाल उन्हाळ कांद्याला जवळपास 1800 रुपये दर मिळत होता. मात्र सद्यस्थितीत हा दर थेट बाराशे ते तेराशे रुपयांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे 400 ते 500 रुपयांची घसरण मागील दहा ते बारा दिवसात पाहायला मिळाली आहे.

लासलगाव बाजार समितीतील कांदा दर 

मार्च महिन्यातील 09 मार्च रोजी लाल कांद्याला 1860 रुपये तर उन्हाळा कांद्याला 1775 रुपये दर मिळाला 11 मार्च रोजी लाल कांदा 1811 रुपये पुन्हा कांदा 1780 रुपये, 12 मार्च रोजी लाल कांदा 1780 तर उन्हाळा कांदा 1651 रुपये, 13 मार्च रोजी लाल कांदा 1700 रुपये तर उन्हाळ कांदा पंधराशे पन्नास रुपये या पाच दिवसांचा विचार केला तर जवळपास शंभर रुपयांची घसरण या दोन्ही कांद्यांत पाच दिवसांत पाहायला मिळाली. त्यानंतर 15 मार्च रोजी लाल कांदा चौदाशे रुपये तर उन्हाळा कांदा 1470 रुपयांवर येऊन ठेपला. 

तर 18 मार्च रोजी लाल कांदा 1315 रुपये उन्हाळ कांदा 1420 रुपये, तर 20 मार्च रोजी लाल कांदा दरात तब्बल दीडशे रुपयांची घसरण झाली, त्या दिवशी लाल कांद्याला 1270 रुपये दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला 1400 रुपये दर मिळाला. 21 मार्च रोजी लाल कांद्याला 1390 रुपये, 1440 रुपये दर मिळाला. 22 मार्च रोजी लाल कांदा 1280 रुपये तर उन्हाळ कांदा 1380 रुपये तर कालच बाजारभाव बघितला असता काल 23 मार्च रोजी लाल कांदा 1360 रुपये तर उन्हाळ कांदा 1380 रुपये दर मिळाला. एकूणच मागील दहा ते बारा दिवसांत कांदा दरात मोठी घसरण झाली असून दुसरीकडे कांदा निर्यातबंदी देखील पुढील आदेश येईपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.

दुष्काळी परिस्थितीतही उपलब्ध असलेल्या पाण्यावर शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतले आहे. आता कांदा बाजार समित्यांमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असतानाही कांद्यावरील निर्यात बंदी कायम ठेवल्याने सरासरी कांदा दर हजार ते बाराशे रुपये प्रति क्विंटल इतके खाली आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सरकारने कांदा निर्यात बंदी 100% खुली करावी, अन्यथा याचे परिणाम येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सरकारच्या विरोधात मतदानातून दिसतील. - भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना

टॅग्स :शेतीनाशिककांदामार्केट यार्डकेंद्र सरकार