Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता 'या' गावात भरणार लासलगाव मार्केटचा उपबाजार, जमीनही दिली, वाचा शासन निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 19:05 IST

Lasalgaon Kanda Market : खानगाव येथील जागा शासकीय दराने किंवा बाजारभावाने संपादित करण्यास बाजार समिती तयार असल्याचे कळविण्यात आले होते.

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला उपबाजारासाठी शासनाकडून मौजे खानगाव येथे ८.६५ एकर जमीन प्रदान करण्यात आली आहे. बाजार समितीने ही जमीन शासकीय दराने किंवा बाजारभावाने संपादित करण्याबाबत तयारी दर्शविल्यामुळे शासनाकडून जमीन प्रदान करण्यात आल्याचे शासननिर्णयात म्हटले आहे. 

मागील वर्षी लासलगाव बाजार समितीच्या १६ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या सभेत १२ क्रमांकाच्या ठरावानुसार खानगाव येथील जागा शासकीय दराने किंवा बाजारभावाने संपादित करण्यास बाजार समिती तयार असल्याचे जिल्हा प्रशासनाला सभापतींकडून कळविण्यात आले होते.

खानगावजवळच्या गट क्रमांक-२ मधील ३१ एकरपैकी ८.६५ एकर जागा घेण्यास समितीने तयारी दर्शविली होती. यानंतर अपर जिल्हाधिकारी यांनी पत्राद्वारे प्रशासनाला कळविल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता.

महाराष्ट्र जमीन महसूल नियमानुसार २०२५-२६ या वर्षाच्या प्रचलित दराच्या बाजारमूल्य दरपत्रकानुसार कब्जेहक्काची संपूर्ण किंमत वसूल करून सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत बाजार समितीच्या सभापती यांना विविध अटी-शर्तीच्या अधीन राहून जमीन प्रदान करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

अशा आहेत अटी व शर्ती

  • कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावचे सभापती जमीन भोगवटदार वर्ग-२ धारण करतील.
  • जिल्हाधिकाऱ्यांसोबत जमीन 3 प्रदानाबाबत 'करारनामा' करणे सभापती यांच्यावर बंधनकारक आहे.
  • शासनाच्या परवानगीशिवाय जमिनीच्या कुठल्याही भागाचे हस्तांतरण करू नये, गहाण ठेवू नये आणि कुठलाही आर्थिक व्यवहार करू नये.
  • जमिनीचा ताबा मिळाल्यापासून तीन वर्षांच्या आत त्या ठिकाणी उपबाजार सुरू करावा.
  • अटी, शर्तीचा भंग झाल्याचे आढळल्यास ही जमीन शासन पुन्हा परत घेईल.
  • प्रदान करण्यात येणारी जमीन ही वनजमीन नाही, याबाबत सक्षम स्तरावर खात्री करून घ्यावी.
  • कोणत्याही सार्वजनिक प्रकल्पाकरिता गरज भासल्यास जमीन पुन्हा ताब्यात घेण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असेल.
  • पिंपळगाव बसवंत-लासलगाव मुख्य रस्ता ते खडक माळेगाव-खानगावजवळचा शिव रस्ता मार्केटच्या मालवाहतुकीसाठी वापरण्यास बांधकाम खात्याची मान्यता घेण्याबाबत पणन विभागाने कार्यवाही करावी.
  • जमिनीवर आवश्यक तितक्या प्रमाणात वृक्षलागवड करणे अनिवार्य राहील, जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी याबाबत पडताळणी करावी आदी अटी, शर्तीचा उल्लेख शासननिर्णयात करण्यात आला आहे.

 

 Weather Update : सद्यस्थितीत पावसाची शक्यता नाही, 'या' 14 जिल्ह्यांत किरकोळ पाऊस, वाचा हवामान अंदाज

 

English
हिंदी सारांश
Web Title : Lasalgaon Market Sub-yard to Open in Khangaon; Land Allotted

Web Summary : The government has allocated 8.65 acres of land in Khangaon for a Lasalgaon market sub-yard. The market committee agreed to acquire the land. The sub-yard must be operational within three years, adhering to specific government terms and conditions.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीनाशिक