भंडारा : आधीच अतिवृष्टी, परतीचा पाऊस आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांचे हंगामी अर्थकारण ढवळून निघाले असताना आता रासायनिक खतांच्या दरवाढीने त्यांच्या कंबरेवर पुन्हा आघात बसला आहे. शासनाच्या निर्णयानुसार नोव्हेंबरपासून खतांचे दर वाढविण्यात आले आहेत.
फक्त काही महिन्यांपूर्वी खरीप हंगामात वापरली गेलेली मिश्रखते आता रब्बीपूर्वीच २०० ते ३०० रुपयांनी महाग झाली आहेत. यामुळे गहू, हरभरा, मूग आणि उडीद यांसारख्या रब्बी पिकांच्या उत्पादनखर्चात वाढ होणार आहे. दरम्यान, राज्यातील मुख्य कृषी निविष्ठा विक्रेत्यांना खत कंपन्यांकडून 'लिंकिंग' प्रणालीखाली अतिरिक्त उत्पादने जसे मायक्रोला, मायक्रोरायझा आणि वॉटर सोल्यूबल खते घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
बाजारभाव पडले, उत्पादन खर्च निघेना
धानाचे एकरी उत्पादन ४ ते ५ क्विंटलवर आले असून खुल्या बाजारातील दर सध्या १८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले आहेत. सोयाबीनचे उत्पादन एकरी ५० ते १०० किलो दरम्यान असून भाव ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांमध्येच स्थिर आहेत. खर्चात वाढ आणि बाजारभावातील घसरण यामुळे पुरता नागविला जात आहे.
१ नोव्हेंबरपासून रासायनिक खताचे नवीन दर
१०.२६.२६ खत १९२५ रुपयांवरून २०२५ रुपये, १२.३२.१६ दर १९०० रुपये असून, पुन्हा वाढीव २०२५ रुपये, १९.१९.१९ दर १९५० रुपयावरून २०७५ रुपये, १४.३५.१४ दर १८०० रुपयावरून २१७५ रुपये असा १ नोव्हेंबरपासून पुन्हा खत दरवाढीचा दणका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.
खरीप हंगामातील आणि रब्बी हंगामात नवीन दर
| रासायनिक खत | खरीप हंगाम दर | रब्बी हंगाम दर |
|---|---|---|
| २०.२०.००.१३ | १२०० रुपये | १५०० रुपये |
| १०.२६.२६ | १४७० रुपये | १९२५ रुपये |
| १४.३५.१४ | १७०० रुपये | १८०० रुपये |
| १५.१५.१५ | १४७० रुपये | १६५० रुपये |
| २४.२४.०० | १८५० रुपये | १९५० रुपये |
| डीएपी | १३५० रुपये | १३५० रुपये |
| पोटॅश | १५५० रुपये | १८०० रुपये |
| ९.२४.२४ | १८०० रुपये | २१०० रुपये |
८.२१.२१ | १८०० रुपये | २१०० रुपये |
११.३०.१४ | १८०० रुपये | १९५० रुपये |
| सुपर फॉस्फेट | ५४० रुपये | ६५० रुपये |
