Navratri Banana Market : नवरात्र महोत्सवात केळीची मागणी वाढेल, दर सुधारतील अशी अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी यंदा निराशा आली आहे. दर कोसळल्याने शेतकरी चिंतेत आहेत. (Navratri Banana Market)
सणासुदीच्या दिवसांत केळीचे भाव २ हजार ते २ हजार ५०० रुपयांपर्यंत जातात, मात्र यंदा अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे मागणी घटल्याने केळीला केवळ ५०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल एवढाच भाव मिळत आहे. (Navratri Banana Market)
उत्पादन खर्च जास्त; दर कवडीमोल
अर्धापूर तालुका केळीसाठी प्रसिद्ध असून येथे शेकडो शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. लागवडीपासून ते घड काढणीपर्यंत शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा खर्च करावा लागतो.
उत्पादन खर्च पाहता केळीला किमान १ हजार ५०० ते २ हजार रुपये प्रतिक्विंटल दर अपेक्षित आहे. परंतु, सध्या मिळणारा दर केवळ काढणीचा खर्च भागवणारा ठरत आहे.
गेल्या वर्षी दर चांगले होते
गतवर्षी नवरात्रात केळीला २ हजार ते २ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल, तर निर्यातीसाठी २ हजार ५०० ते २ हजार ६०० रुपये दर मिळाला होता. त्यामुळे शेतकरी आनंदी होते. यावर्षी मात्र सप्टेंबरपासूनच दर अचानक गडगडले.
शेतकरी काय सांगतात
दोन एकरांमध्ये तीन हजार रोपे लावली. सध्या काढणी सुरू झाली आहे, पण बाजारात मागणी नाही. भाव नसल्याने कवडीमोल दराने केळी विकावी लागत आहे.- नाथराव चव्हाण, शेतकरी
सप्टेंबर लागताच केळीचे भाव कोसळले. सध्या ६००-७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. केळीसाठी केलेला खर्चही परत येत नाही.- संतोष चव्हाण, शेतकरी
सणासुदीतही मागणी नाही
गणेशोत्सव, गौरी-गणपती, नवरात्र असे अनेक सण या काळात येतात. या काळात केळीला भरघोस मागणी असते, मात्र यंदा अतिवृष्टी, पूरस्थिती आणि बाजारपेठेतील मंदीमुळे मागणी कोसळली आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.