नंदुरबार : मिरची आगार असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीपासून वेळोवेळी सुरू असलेल्या पावसामुळे मिरची आवक पूर्णपणे थांबली आहे. तब्बल २० हजार क्विंटल लाल मिरची बाजारात पोहोचू न शकल्याने दोन कोटी रुपयांपेक्षा अधिकची उलाढाल बंद आहे. परिणामी शेतकरी, व्यापारी, आडतदार यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
जिल्ह्यात २५ ऑक्टोबरपासून पाऊस सुरु आहे. तत्पूर्वी १८ ऑक्टोबरपासून दिवाळीच्या सुट्या असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीतील मिरची खरेदी बंद होती. दिवाळीनंतर ही खरेदी सुरु होण्याची शक्यता असतानाच २५ ऑक्टोबरपासून पावसाने सुरुवात केली. यामुळे शेतशिवारात पाणी साचून मजूरांना मिरची तोडणी करणे कठीण झाले आहे. मिरची तोड थांबली असल्याने झाडावर येणारे फळ खराब होण्याची शक्यता वाढत आहे.
मिरची पथारीवरही ओलावा, व्यापारीही संकटात
देशातील दुसऱ्या क्रमांकांची मिरची बाजारपेठ म्हणून नंदुरबाची ओळख आहे. मिरची खरेदी करुन त्यावर प्रक्रिया करणारे ५० पेक्षा अधिक उद्योग नंदुरबार शहरात सुरु आहेत. या व्यापाऱ्यांना यंदा पावसाचा फटका बसला आहे. आधी खरेदी केलेली मिरची सुकविण्यासाठी व्यापाऱ्यांकडे जागा नसल्याने समस्या वाढल्या आहेत. यात पाऊस आणि ढगाळ वातावरण टिकून राहिल्यास नुकसान वाढणार आहे.
शेतात पाणी अन् ओलावा, सांगा पाय कसा ठेवावा..
नंदुरबार बाजारात दिवाळीपूर्वी १ आवक होणाऱ्या विविध वाणांना २ हजार ७०० ते ५ हजार ५०१ रुपये प्रतिक्विंटल दर देण्यात येत होता. यात प्रामुख्याने शार्क वन आणि गौरी हे भरमसाठ उत्पादन देणारे वाण सध्या बाजारात येत होते. या मिरचीची ३ ऑक्टोबरपासून खरेदी सुरु झाली होती.
१७ ऑक्टोबरपर्यंत बाजारात साधारण १५ हजार क्विंटलपेक्षा अधिक मिरची खरेदी करण्यात आली होती. यातून अडीच कोटींची जवळपास उलाढाल झाली होती. दिवाळीनंतर मात्र सुट्यांमुळे आवक थांबली, काही शेतकऱ्यांनी दिवाळीत मिरची तोडून ठेवत साठा केला होता. तब्बल १० हजार क्विंटलच्या घरात ही मिरची आहे. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना संपर्क करुन याची माहितीही दिली होती. परंतू पावसामुळे ही मिरची बाजारात आणणे आता अशक्य आहे.
नंदुरबार, शहादा आणि तळोदा या प्रमुख मिरची उत्पादक भागात मुसळधार पाऊस सध्या सुरु आहे. यामुळे मिरचीच्या शेतात पाणी आहे. शहादा तालुक्यात ३४२ हेक्टरवरची मिरची आधीच शेतकऱ्यांच्या हातून गेली आहे. उर्वरित १ हजारापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रातील मिरचीचे शेत ओले आहे. यामुळे तेथे पाय ठेवणे उत्पादकांना कठीण आहे. शेतकरी पाऊस थांबण्याची वाट बघत आहेत.
