नंदुरबार :मिरची आगार असलेल्या नंदुरबारात मिरची आवक पुन्हा घसरली आहे. या घसरणीमुळे बाजारपेठेतील उलाढालीवर परिणाम झाला असून, मिरची हंगाम यंदा १ लाख २५ हजार क्विंटलपर्यंत मर्यादित राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
बाजारात सध्या मिरचीची वाण निहाय प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ५ हजार ५०० दर देऊनही आवक कमी झाली आहे. आज अखेरीस नंदुरबार बाजारात केवळ ८० हजार क्विंटल मिरचीची आवक झाली आहे. सध्या नंदुरबारातील पथारींवर आवश्यक तेवढी मिरची येत नसल्याने महिलांना मिळणाऱ्या रोजगारातही घट आली आहे.
केवळ ८० हजार क्विंटल आवक
नंदुरबार बाजारात आजअखेरीस ओल्या लाल मिरचीला २ हजार ५०० ते ५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दर दिला जात आहे. सुक्या लाल मिरचीला व्यापारी सर्वाधिक ६ हजार ते ११ हजार प्रतिक्विंटल दर देण्यात येत आहेत. गतवर्षीपेक्षा हे दर काहीअंशी अधिक आहेत. २०२३-२०२५ या हंगामात नंदुरबार बाजारात ३ लाख २५ हजार क्विंटल, तर २०२४-२०२५ या हंगामात २ लाख क्विंटल मिरची खरेदी करण्यात आली होती. यंदा ही आवक १ लाख २५ हजारांपर्यंत राहणार आहे.
मिरची पावडर तयार करणारे ४० उद्योजक यंदा अडचणीत
नंदुरबारमधील लाली, व्हीएनआर आणि तेजा या मिरची वाणांपासून तयार केलेली पावडर देशात निर्यात केली जाते. नंदुरबारात पावडर तयार करणारे ४० कारखाने आहेत. मिरची पावडर तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल सध्या पुरेसा नसल्याने कारखान्यांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होत आहे.
नंदुरबार शहरातील ४० मिरची पावडर तयार करणारे उद्योग आहेत. या उद्योगातून दरवर्षी १० हजार टन मिरची पावडर तयार करून निर्यात केली जाते. यासाठी साधारण अडीच लाख क्विंटल मिरचीची खरेदी आवश्यक आहे. परंतु यंदा एक लाख २५ हजार क्विंटल मिरचीची आवक होण्याची शक्यता आहे.
