नंदुरबार : दोंडाईचा शहरातील एकेकाळी 'लाल मिरचीचे शहर' म्हणून जगभरात ख्याती असलेल्या दोंडाईचा परिसरात आता मिरचीची क्रेझ हळूहळू कमी होताना दिसत आहे. झणझणीत आणि चमचमीत अन्नाची मागणी वाढत असली, तरी उत्पादनातील घट आणि वाढता खर्च यामुळे मिरची उद्योग संकटात सापडला आहे.
३५ वर्षापूर्वी दोंडाईचातून लाल मिरची पावडरची थेट परदेशात निर्यात केली जात असे. त्यावेळी ५ मोठे कारखाने आणि २ किलोमीटरपर्यंत पसरलेल्या मिरचीच्या थारी (पथारी) पाहायला मिळत होत्या. मात्र, आज चित्र उलटे झाले आहे. एकेकाळी निर्यात करणाऱ्या दोंडाईचात आता आंध्र प्रदेशातील गुंटूर, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून 'सी-५', 'प्रजा', '३४१' यांसारख्या वाणांची आयात करावी लागत आहे.
१ कोटींची उलाढाल; तफावतीने शेतकरी चिंतेत
येथील बाजार समितीत २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत लाल मिरचीची ३ हजार १२७ क्विंटल आवक झाली असून, त्यातून सुमारे १ कोटी ६ लाख ६६ हजार रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. यंदा ओल्या मिरचीला प्रति 3 क्विंटल किमान १ हजार ५०० रुपये ते कमाल ४ हजार ८५१ रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. मात्र, मिरचीचा सरासरी भाव ३ हजार ४०० रुपयांच्या आसपास स्थिरावल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे.
उत्पादन घटीची कारणे
मिरची लागवड कमी होण्यामागे अनेक जागतिक आणि स्थानिक कारणे आहेतः बेमोसमी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान. बी-बियाणे आणि खतांचे दर भरमसाठ वाढले आहेत, तसेच मजुरीच्या दरात प्रचंड वाढ, मात्र त्या तुलनेत मिरचीला मिळणारा बाजारभाव स्थिर आहे. एकाच जमिनीत वारंवार तेच पीक घेतल्याने रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
अमरावती धरणात साठा असल्याने मिरची उत्पादक शेतकरी अधिक आहे. त्यात मिरची घेणाऱ्या व्यापाऱ्याची संख्या वाढल्यास, मिरचीवर आधारित कृषी उद्योग निर्मिती, मिरची तेल उद्योग, कमी खर्चात बी बियाणे-रोप मिळाले तर पुन्हा मिरचीची लागवड वाढेल, यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहेत.
- प्रमोद सोनवणे, शेतकरी, दौडाईचा
