NAFED Shetmal Kharedi : हमीदराने सोयाबीन, मूग आणि उडीद खरेदी सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर शेतकरी खरेदी केंद्रांवर नोंदणीसाठी गर्दी करत आहेत. (NAFED Shetmal Kharedi)
मात्र, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, सर्व्हर डाऊन, तसेच बायोमेट्रिक ठसे न उमटणे यामुळे शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी ताटकळत बसावे लागत आहे. (NAFED Shetmal Kharedi)
१३ नोव्हेंबरपर्यंत बीड जिल्ह्यात सोयाबीन व उडीद विक्रीसाठी एकूण ११ हजार १४२ शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे.(NAFED Shetmal Kharedi)
नोंदणीतील अडथळे कायम
शेतकरी खरेदी केंद्रांवर कागदपत्रांसह पोहोचत असले तरी ठसा न लागणे, कमी इंटरनेट स्पीड, आणि सर्व्हर डाऊन यामुळे नोंदणीला उशीर होत आहे. काही केंद्रांवर तासन्तास रांगा लागत असून शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
बीड जिल्ह्यातील नोंदणीची परिस्थिती
सध्या २३ खरेदी केंद्रांवर नोंदणी सुरू असून सर्वाधिक नोंदणी अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर केंद्रावर १ हजार ९३६ झाली आहे.
इतर प्रमुख केंद्रांवरील नोंदणी
बीड – ८३१ शेतकरी
आनंदवाडी – ८०५
वडवणी – ७०१
उर्वरित १९ केंद्रांवरही शेतकरी मोठ्या प्रमाणात नोंदणीसाठी उपस्थित आहेत.
१५ नोव्हेंबरपासून सोयाबीन, मूग, उडदाची अधिकृत खरेदी प्रक्रिया बीड जिल्ह्यातील सर्व २३ केंद्रांवर सुरू होणार आहे.
सोयाबीनसाठी १० हजार ४१० आणि उडदासाठी ७३२ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. एसएमएस मिळताच शेतकऱ्यांनी शेड्यूलप्रमाणे केंद्रावर माल आणावा.- एच. डी. भोसले, जिल्हा मार्केटिंग अधिकारी
बाजारभावात वाढ परंतु हमीभावापर्यंत अंतरच
खुल्या बाजारात सोयाबीनचे दर सध्या ४ हजार ३०० ते ४ हजार ८०० दरम्यान प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
अलीकडच्या दोन दिवसांत दरात वाढ झाली असली तरी हमीभाव ५ हजार ३२८ पर्यंत पोहोचले नाहीत.
व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जास्त आर्द्रता, नॉन-एफएक्यू माल, तातडीची आर्थिक गरज यामुळे बरेच शेतकरी हमीभावाची वाट न पाहता खुल्या बाजारातच विक्री करत आहेत.
नाफेडचे नियम काय?
* १२% आर्द्रता असलेला सोयाबीनच खरेदीस पात्र
* केंद्रांवर चाळणीसाठी ६० ते ८० रुपये प्रति क्विंटल खर्च
* हमाली + वाहतूक खर्च वाढल्याने शेतकरी हमीभाव टाळून बाजारात विक्रीला प्राधान्य देतात
* उत्पन्न कमी आहे, खर्च मात्र जास्त. हमीभाव मिळेपर्यंत थांबणे अवघड जाते असल्याचे शेतकरी सांगतात.
शासनाने जाहीर केलेले हमीभाव
सोयाबीन – ५ हजार ३२८ रुपये
मूग – ८ हजार ७६८ रुपये
उडीद – ७ हजार ८०० रुपये
अतिवृष्टीमुळे सोयाबीनची सरासरी उत्पादकता ६ क्विंटल प्रति हेक्टर इतकी खाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता खरेदी मर्यादा किती असेल? जुना साठा विकता येईल का? याबाबतची चिंता वाढली आहे.
उत्पादकता घटली
बऱ्याच शेतकऱ्यांनी मागील वर्षाचे सोयाबीन साठवून ठेवले आहे. पण यावर्षी उत्पादन कमी असल्याने शासकीय खरेदी केंद्रांवर प्रति हेक्टर किती माल स्वीकारला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
