NAFED Registration : नाफेडच्या केंद्रांत सोयाबीन विक्रीकरिता शेतकऱ्यांची नोंदणी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सिस्टिमद्वारे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचा नाफेड खरेदी केंद्रांवर अंगठा द्यावा लागतो. मात्र, ठसे न जुळणे, सर्व्हर डाऊन असणे त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. (NAFED Registration)
शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ३० ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी जाहीर केली. यासाठी खरेदी केंद्रावर शेतकऱ्याने स्वतः उपस्थित राहून अंगठा लावून नोंदणी करावी लागणार आहे. (NAFED Registration)
१५ नोव्हेंबरपासून खरेदी सुरू होईल. त्यानंतर जेव्हा खरेदीसाठी नंबर येईल, तेव्हा पुन्हा एकदा अंगठा लावावा लागणार आहे. यासाठी प्रत्येक केंद्रावर प्रिंटर्स दिले आहेत. हे जाचक नियम कशासाठी, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. (NAFED Registration)
वर्षभर सोयाबीनला हमीभाव मिळालेला नाही, त्यातच उत्पादनात कमी आलेली आहे. अशा परिस्थितीत अर्धाअधिक शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपल्यानंतर शासनाने हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी सुरू केलेली आहे. त्यातच अटी, शर्ती लादल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यात यंदा पुन्हा अंगठा अनिवार्य केल्याने वयोवृद्ध शेतकरी त्रस्त झाले आहे.
सोयाबीन खरेदी केंद्र
७ केंद्र जिल्ह्यात खरेदी प्रक्रियेसाठी सुरू केले आहेत. यात राज्य पणन महासंघाचे ३ आणि विदर्भ पणन महासंघाचे ४ केंद्र आहेत. त्याशिवाय महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्या मार्फत ०८ शेतकरी उत्पादक कंपन्यांचे (एफपीसी) प्रस्ताव मंजूरी करीता नाफेडकडे पाठविण्यात आले आहेत.
नोंदणी विक्रीसाठी बायोमेट्रिकची अट !
यावेळी सोयाबीनची नोंदणी व विक्रीवेळी बायोमेट्रिकची अट ठेवण्यात आलेली आहे. त्याकरिता सर्व केंद्रांना पीओएस थंब मशीनचा पुरवठा करण्यात आला. सातबारा, शेतमाल, आधार क्रमांक असताना अंगठा कशासाठी, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.
कामे सोडून शेतकरी रांगेत !
सध्या शेतात रब्बीची कामे चालू आहेत. अगोदरच खरिपात नुकसान झाले आहे. त्यात कामासाठी शेतमजूर मिळत नसल्याने शेतकरी स्वतः रात्रंदिवस शेतात राबत आहे. त्यात शासन शेतकऱ्यांना स्वतः ऑनलाइन करण्यासाठी उपस्थित राहण्याची सक्ती करीत आहेत
ठसे पुसट, सर्व्हरही डाऊन!
नोंदणीवेळी कधी सर्व्हर डाऊन, तर कधी संकेतस्थळ बंद, अशा समस्यांना सामोरे जावे लागते. वयोवृद्ध शेतकरी व महिला शेतकऱ्यांना दोन-दोन दिवस खरेदी केंद्रावर थांबणे शक्य नसते. यातच ठसे पुसट असल्याने बायोमेट्रिक होत नसल्याचे शेतकरी त्रस्त झाले आहे.
बायोमेट्रिक कशासाठी ?
सोयाबीनच्या नोंदणीवेळी संबंधित शेतकऱ्याचा सात-बारा, आधार क्रमाक पासबुक, फार्मर आयडी आदी कागदपत्रे घेण्यात येतात. यावेळी बायोमेट्रिकची अट आहे.
नोंदणीसाठी प्रक्रिया काय?
ऑनलाइन नोंदणीसाठी स्वतः अंगठा लावून प्रिंट करण्यासाठी खरेदी केंद्रावर जाणे यावेळी बंधनकारक करण्यात आलेले आहे.
नोंदणीसाठी ई-समृद्धी ॲप
नाफेडच्या केंद्रात नोंदणीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी नाफेडने ई-समृध्दी हे मोबाइल ॲप विकसीत केले असून, या ॲपच्या आधारे शेतकऱ्यांना हमीभाव योजनेंतर्गत शेतमाल विकण्यासाठी नोंद करावी लागणार आहे.
शेतकऱ्याच्या अंगठ्याचे दोनवेळा ठसे कशाला पाहिजेत, मुळात अशा अटी म्हणजे शेतकऱ्यांना हमीभावापासून वंचित ठेवण्याचा प्रकार आहे. - तुकाराम पाटील, शेतकरी
