नाशिक : नाफेड अन् एनसीसीएफचा कांदा येत्या आठवड्यात बाजारात येईल. नाशिक शहरात सात तर जिल्ह्यात १७ मोबाइल व्हॅनद्वारे कांदा ग्राहकांपर्यंत पोहोचविला जाईल. राजधानी दिल्लीत या दोन संस्थांनी गुरुवारपासून २४ रुपये किलोप्रमाणे कांदा विक्री सुरू केली.
तर नाशिककरांनाही याच भावात कांदा मिळेल, असे स्थानिक आधिकाऱ्यांनी सांगितले. या दोन संस्थांकडून शहर व जिल्ह्यात प्रथमच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा विक्री होणार आहे.
नाफेड व एनसीसीएफला तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २ लाख ७० हजार मे. टन कांदा खरेदी झाली आहे. आता हाच कांदा ग्राहकांना उपलब्ध करून दिला जात आहे.
त्यामुळे या दोन सरकारी संस्थांचा कांदा बाजारात आल्यास ग्राहकांना काहीसा दिलासा मिळेल. मात्र, मागील वर्षाप्रमाणे कांदा विक्रीचा घोळ व्हायला नको, अशी अपेक्षा आहे. ग्राहकांना कमी भावात कांदा मिळेल, शेतकऱ्यांना मात्र यंदाही कमी किमतीत कांदा विकावा लागला. त्यामुळे ग्राहक तुपाशी अन् शेतकरी उपाशी, अशी स्थिती आहे.
ट्रॅक अँड ट्रेस' थांबवेल घोळ
व्यवहार पारदर्शीपणे होऊन ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी नाफेड अन् एनसीसीएफने 'ट्रॅक अँड ट्रेस' सॉफ्टवेअरसह एक नवीन समर्पित बिलिंग ॲप्लिकेशन लाँच केले आहे. याद्वारे किरकोळ विक्री आणि मोबाइल व्हॅन विक्री प्रक्रिया स्वयंचलित केली जाईल, ग्राहकांना मोबाईल ॲपवरून थेट विक्री बिल मिळेल. व्यवहाराची माहिती लाभार्थ्यांपर्यंत एसएमएसद्वारे पोहोचेल. ॲप सर्व मोबाइल व्हॅन चालकांच्या मोबाइल फोनमध्ये इन्स्टॉल केले जाईल. त्यामुळे कांदाविक्री व्हॅनचे लाइव्ह लोकेशनही कळेल.
२७ टक्के उत्पादन वाढणार?
२०२५ मध्ये कांद्याचे उत्पादन ३०७.७१ लाख टन होण्याचा अंदाज आहे, जो गेल्या वर्षीपेक्षा २७ टक्के जास्त आहे. जुलैमध्ये १.०६ लाख टन कांदा निर्यात करण्यात आला आहे. किमती स्थिर ठेवण्यासाठी, सरकारने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला ३.०० लाख टन कांदा साठवला आहे.