Join us

आतापर्यंत नाफेड, एनसीसीएफ कांदा खरेदी किती झाली, खरेदीच्या मुदतीचं काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:38 IST

Nafed Kanda Kharedi : तब्बल महिनाभर उशिराने सुरू झालेली खरेदी, खासगी व्यापाऱ्यांच्या तुलनेने जास्त भाव न दिल्याने योजनाच वांध्यात सापडली आहे.

नाशिक :नाफेड व एनसीसीएफने राज्यात ४४ कांदा खरेदी केंद्रांच्या माध्यमातून तीन आठवड्यांपूर्वी कांदा खरेदी सुरू केली; मात्र मागील वर्षी कांदा घोटाळ्याने गाजलेली या दोन संस्थांची कांदा वितरण व्यवस्था यंदा ढिसाळ नियोजनामुळे वांध्यात आली आहे. तब्बल महिनाभर उशिराने सुरू झालेली खरेदी, खासगी व्यापाऱ्यांच्या तुलनेने जास्त भाव न दिल्याने योजनाच वांध्यात सापडली आहे.

३१ जुलैपर्यंत नाफेड व एनसीसीएफला प्रत्येकी दीड लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, २८ जुलैअखेर केवळ दीड लाख मेट्रिक टन इतकाच कांदा खरेदी झाल्याने कांदा विक्रीसाठी मुदतवाढ मिळावी, यासाठी या दोघा संस्थांनी पुन्हा केंद्र सरकारकडे हातपाय पसरले आहे.

या ४४ पैकी ३८ खरेदी केंद्र एकट्या नाशिक जिल्ह्यातील असून, जुन्नर, संगमनेर, पारनेर, वैजापूर, संगमनेर येथे पाच खरेदी केंद्रे आहेत. याही जिल्ह्यात नाफेड, एनसीसीएफच्या कांदा खरेदीचे चांगलेच वांधे झाले आहेत. नाफेडची शनिवार (दि.२६) अखेर ८१ मे.टन कांदा खरेदी नाफेडची, तर जवळपास ७० मे.टन कांदा खरेदी एनसीसीएफची झाली आहे. अनेक उपाय करूनही शेतकऱ्यांनी या दोन खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविली आहे.

शेतकऱ्यांची सर्वच बाजूने कोंडीबाजार समित्यांमध्येदेखील कांदा दरात घसरण सुरू असल्याने शेतकरी हवालदिल आहेत. त्यामुळे कांदा बाजाराकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. भाव वाढतील या अपेक्षेने चाळीत साठविलेला कांदा, दरात सातत्याने होत असलेली घसरण, सरकारचे कागदी घोडे नाचविणारे धोरण, नाफेड व एनसीसीएफ या केंद्रीय संस्थांची कांदा खरेदी करण्याची केवळ औपचारिकता या कारणांनी कांदा उत्पादकाच्या डोळ्यांत अश्रूच आहे.

असा होईल परिणामनाफेड ही एक सरकारी संस्था आहे जी कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना चांगला भाव देण्याचा प्रयत्न करते. मागील वर्षी देखील नाफेड, एनसीसीएफ कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करू शकले नाही. तीच गत यावर्षी होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला कांदा कमी भावात विकावा लागेल, किरकोळ बाजारातही कांद्याचे दर कमी होतील

प्रतिसाद कमी तरी भाव ५० रु. केले कमीएकीकडे कांदा भावात सुधारणा दिसून येत नसल्याचे चित्र आहे. त्यात नाफेडची कांदा खरेदी संथगतीने सुरू आहे. अशातच नाफेडने २६ जुलैला नवा दर जाहीर केला आहे. केवळ १४६५ चा दर जाहीर केला. पहिला दर १५१५ असा होता. म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांचा आपल्या खरेदी केद्रांवर प्रतिसाद मिळत नसताना नाफेडने भाव वाढविण्याचे उपाय शोधून उलट भाव ५० रुपयांनी कमी केले. त्यामुळे आश्चर्यच म्हणावे लागेल. 

तर खासगी व्यापाऱ्याकडे सोमवारचा (दि.२८) दर कमाल १५०० व साधारण १३५० ते १३६० असा होता. त्यातही या दोन संस्थांकडे ऑनलाइन नोंदणी वगैरे भानगडी. त्यामुळे इतके करूनही क्विंटलमागे केवळ ६० ते ७० रुपये जास्त मिळत असल्याने नाफेडच्या कांदा खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असून, खासगी व्यापाऱ्यांकडेच ते कांदा देत आहेत.

कांदा खरेदीची मुदत वाढवून देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. नाफेडचे कांद्याचे भाव दिल्लीतून ठरत असतात. लवकरच मुदतवाढ मिळेल. मात्र, खरेदी केंद्र बंद होणार नाही. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नाफेडकडे कांदा द्यावा.- आर. एम. पटनायक, शाखा व्यवस्थापक नाफेड. 

Nafed Kanda Rate : नाफेडकडून कांदा खरेदीचा नवा दर जाहीर, वाचा सविस्तर

टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्र