नंदुरबार : अवकाळी पावसाने आणि त्याआधी विविध रोगांच्या प्रादुर्भावाने मिरची पिकावर यंदा संकट आले. त्यामुळे बाजारात ओली लाल मिरचीची आवक मोठ्या प्रमाणावर मंदावली आहे.
सद्यःस्थितीत बाजारात हजार ते दीड हजार क्विंटल आवक होत असून, भाव देखील अतिशय कमी अर्थात दोन हजार ७०० ते साडेचार हजार रुपयांपर्यंत मिळत आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा आवक निम्म्यापेक्षा कमी राहणार असल्याची शक्यता आहे. पावसाने उरल्यासुरल्या आशेवर देखील पाणी फेरले. दररोज होणारी पाच ते साडेपाच हजार क्विंटल आवक अवधी दीड ते दोन हजार क्विंटलवर येऊन ठेपली आहे.
वाण व दर्जावर मिळतो भाव
नंदुरबारात विविध वाणांच्या मिरचीची आवक होते. मिरचीचे वाण आणि दर्जा पाहून भाव ठरत असतात. सध्या चांगल्या दर्जाच्या मिरचीला साडेतीन ते साडेचार हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे.
येथे येणाऱ्या मिरचीच्या वाणात ३ व्हीएनआर, गोल्डन, फुले साई, फाफडा, शंकेश्वरी, जी-फोर, जी फाइव्ह यांसह इतर वाणांच्या मिरचीचा समावेश आहे. त्यानुसार साधारणतः २,७०० ते ४,५०० रुपये भाव मिळत आहे. साधारणतः दररोज ६० ते ८० वाहने येत आहेत. एकूण आवक ही दीड ते दोन हजार क्विंटलच्या दरम्यान राहत आहे.
गेल्या वर्षी २ लाख क्विंटल
गेल्यावर्षी दोन लाख क्विंटल मिरचीची आवक येथील बाजार समितीत झाली होती. गेल्या वर्षी हंगाम देखील चांगला होता. लागवड देखील मोठ्या प्रमाणावर झाली होती.
ही बाब लक्षात घेता आवक दोन लाख क्विंटलचा टप्पा पार करून गेली होती. यंदा मात्र एक लाख क्विंटल देखील आवक होणार नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत निम्मेच आवक राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.
