- सतीश जमदाडे
चंद्रपूर : युरोपात लाल वाळलेल्या मिरचीला (Mirachi Aavak) चांगलीच मागणी आहे. शिवाय भावही योग्य आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरपना व राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांची वाळलेली लाल मिरची आज युरोपात निर्यात करण्यात येणार आहे. युरोपियन मानांकनात चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur District) बिबी येथील लाल मिरची फिट बसली आहे. ही वाळलेली लाल मिरची (Lal Mirchi Export) शेतकरी कुटुंबाच्या चेहन्यावर लाली आणणार आहे.
कोरपना आणि राजूरा तालुक्यात कापूस, सोयाबीन ही प्रमुख पिके आहेत. त्यासोबतच मिरचीचे उत्पादन घेतले आते. परंतु पारंपरिक पद्धतीने घेण्यात येणाऱ्या मिरचीला फारशी मागणी नाही. भावही अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांना फारशी आर्थिक उन्नती साधता आली नाही. परंतु कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीने कोरपना व राजूरा तालुक्यातील मिरची उत्पादकांना आधुनिक पद्धतीने मिरची पिकाची लागवड करण्यासाठी प्रोत्साहित केले. यातून त्यांना आर्थिक प्रगतीचा मार्ग गवसला आहे.
खास करून युरोपियन मानकांनुसार मिरची पिकांचे उत्पादन घेण्याबाबत कृषितज्ज्ञांच्या मार्गदर्शनात धडे दिले. त्यामुळे पहिल्यांदाच कोरपना तालुक्यात ८५० हेक्टर आणि राजुरा तालुक्यात ३०० एकरमध्ये मिरचीची लागवड करण्यात आली. लागवड करण्यात आलेल्या मिरची पिकांचे युरोपियन मानकांनुसार संवर्धन करण्यात करण्यात आले. हानिकारक रसायनांचा वापर कमी करून अवशेष मुक्त मिरची उत्पादनाचा प्रायोगिक प्रयोग राबविण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांनी केला सन्मान
चंद्रपूर जिल्ह्यात सद्यस्थितीत लाल मिरचीला फारसा भाव नाही. युरोपात मात्र लाल मिरचीचा चांगला भाव आहे. युरोपियन बाजारपेठेत शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार असल्याने मिरची उत्पादक यावेळी आनंदित दिसून येत आहे. कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रयत्नामुळे जागतिक बाजारपेठेत चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना व राजुरा तालुक्यातील मिरची उत्पादक पोहोचला असल्याची दखल जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी घेतली. कोरपना तालुक्यातील बिबी या गावचे मिरची उत्पादक स्वप्निल झुरमुरे व चंद्रकांत पिंपळकर यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी सन्मान केला.
प्रयोग ठरला यशस्वी
पहिल्याच वर्षी करण्यात आलेल्या प्रयोगात सहभागी झालेल्या चार शेतकऱ्यांची मिरची युरोपियन बाजारपेठेतील कठोर गुणवत्तेच्या निकषांत बंगळुरू येथे करण्यात आलेल्या परीक्षणात उत्तीर्ण ठरली आहे. या प्रयत्नांचे फलित म्हणून बिबी येथील स्वप्निल झुरमुरे, चंद्रकांत पिंपळकर या दोघांची मिरची उत्पादनाने युरोपियन बाजारपेठेतील कठोर गुणवत्तेच्या निकषांत यशस्वीरीत्या प्रवेश मिळवला आहे. लवकरच लाल मिरची जागतिक बाजारपेठेत उपलब्ध होईल.
कृषी विभागाचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्यामुळे यामुळे आज आमची लाल मिरची युरोपात पाठवू शकलो. आतापर्यंत १८ क्विंटल विक्रीला गेली आहे. यामुळे आम्ही समाधानी आहोत.
- स्वप्निल झुरमुरे, मिरची उत्पादक शेतकरी