Market Update : गव्हाला योग्य भाव, सोयाबीनची झेप कायम आणि ज्वारीलाही स्थिर दर मिळाल्याने परतुर बाजारात शनिवारी व्यवहारात उत्साह दिसला. भावातील स्थिरतेमुळे शेतकरी समाधानी आहेत.(Market Update)
परतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी झालेल्या लिलावात गहू, ज्वारी आणि सोयाबीन या प्रमुख पिकांना समाधानकारक दर मिळाले. भावात मोठ्या चढउताराऐवजी स्थिरता दिसल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिलासा उमटला आहे.(Market Update)
स्थिर दरामुळे दिलासा
गेल्या काही दिवसांपासून गहू व सोयाबीनच्या भावात स्थिरता कायम असून, ज्वारीलाही योग्य दर मिळत आहे. मालाची आवक तुलनेने कमी असली तरी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळाल्याने समाधान आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, भाव जर अशाच पद्धतीने स्थिर राहिले आणि यंदाचा नवीन सोयाबीन बाजारात दाखल झाल्यानंतरही ही परिस्थिती कायम राहिली, तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो.
परतूर येथील बाजारभाव (शनिवारचे दर)
पीक प्रकार | किमान दर (₹) | कमाल दर (₹) | सरासरी दर (₹) |
---|---|---|---|
गहू | २,१८९ | २,२५० | २,६३५ |
ज्वारी (पांढरी) | २,००० | २,२२६ | २,२२५ |
सोयाबीन (पिवळा) | ४,२०० | ४,६७० | ४,३५० |
शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा संबंध हा उन्हातल्या सावलीसारखा आहे. योग्य नियोजन केले तर दोघांनाही फायदा होतो. श्रावण महिन्यात सणांमुळे खरेदी-विक्रीत तेजी दिसते. मात्र शासनाच्या निर्बंधांमुळे व्यापारात काही मर्यादा येतात.- दिनेश होलाणी, व्यापारी
आमच्याकडे गहू, ज्वारी, सोयाबीन, तूर, कापूस हा माल जेव्हा घरात असतो तेव्हा भाव नसतो; पण माल संपला की दर वाढतात. व्यापारी मालामाल होतात आणि शेतकरी मात्र १२ महिने बेहाल राहतात. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे ठोस निर्णय घ्यायला हवेत.- भुजंग बरकुले, शेतकरी
सध्या गहू व सोयाबीनच्या भावातील स्थिरता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत असली, तरी दीर्घकालीन दृष्टीने बाजार धोरणात बदल व शेतकरी हिताचे निर्णय होणे आवश्यक आहे, अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.