संजय लव्हाडे
जालना बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात मोठी मंदी नोंदवली गेली असताना, दुसरीकडे खाद्यतेल आणि सरकी ढेपेच्या दरात वाढ झाली आहे. (Market Update)
धान्य बाजारात मालाची आवक समाधानकारक असली तरी कोणतीही मोठी तेजी-मंदी दिसून येत नाही. जानेवारी महिन्यासाठी साखरेचा कोटा जाहीर झाल्याने साखरेचे दर सध्या तरी स्थिर राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Market Update)
सोन्या-चांदीच्या दरांनी अलीकडे ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानंतर आता दरात घसरण झाल्याने ग्राहक आणि व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.(Market Update)
जालना सराफा बाजारात सोन्याचे दर १ लाख ३९ हजार रुपये प्रति तोळा, तर चांदीचे दर २ लाख ३५ हजार रुपये प्रति किलो इतके नोंदवले गेले आहेत. (Market Update)
तुरीचे दर हमीभावाखाली
तुरीच्या बाबतीत आयातीचा मोठा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. सध्या तुरीचे दर हमीभावापेक्षा ८०० ते १,००० रुपये प्रतिक्विंटलने कमी आहेत.
यामुळे कर्नाटक आणि गुजरात सरकारने हमीभावाने खरेदी सुरू केली आहे. महाराष्ट्र शासनानेही वेळेत तुरीची हमीभावाने खरेदी सुरू केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो, अशी मागणी होत आहे.
जालना बाजारात तुरीची आवक सुमारे १ हजार २०० पोते इतकी असून,
पांढरी तूर : ५,००० ते ७,००० रुपये
लाल तूर : ५,५०० ते ७,००० रुपये
असे दर नोंदवले गेले आहेत.
धान्य बाजारात स्थैर्य
धान्य बाजारात आवक चांगली असली तरी मोठ्या दरवाढीचा किंवा घसरणीचा कल नाही. सध्याचे दर पुढीलप्रमाणे (प्रति क्विंटल)
गहू : २,५०० ते ५,०००
ज्वारी : २,००० ते ४,६००
बाजरी : २,४०० ते ३,१००
मका : १,४५० ते १,८५०
हरभरा : ४,००० ते ४,८००
उडीद : ४,२०० ते ५,९००
गूळ : ३,१०० ते ४,२००
सरकी ढेप व खाद्यतेल महागले
सरकी ढेपेचा मोठ्या प्रमाणावर साठा करण्यात आल्याने प्रतिक्विंटल ३०० रुपयांची तेजी आली आहे. सध्या सरकी ढेपेचे दर ३ हजार ४०० ते ३ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. याचबरोबर खाद्यतेलाच्या दरातही २०० ते ३०० रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.
शेंगदाणे महागले
उत्पादनात घट झाल्यामुळे शेंगदाण्याच्या दरात ३०० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या शेंगदाण्याचे दर १० हजार ते १२ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल इतके आहेत.
साखरेचे दर स्थिर
जानेवारी महिन्यासाठी सरकारने २२ लाख टन साखरेचा कोटा जाहीर केला आहे. त्यामुळे साखरेच्या दरात सध्या तरी मोठी तेजी किंवा मंदी होण्याची शक्यता दिसत नाही. साखरेचे दर ४ हजार ५० ते ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल इतके स्थिर आहेत.
सोयाबीनला मागणी; शेतकऱ्यांत उत्साह
प्रमुख बाजारपेठांमध्ये सोयाबीनला समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मागणी कायम असल्याने आगामी काळात दर टिकून राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
