संजय लव्हाडे
राज्यभरात अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. अनेक पिकांचे नुकसान झाले असून त्यातूनच सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. ज्वारीमध्ये तेजी तर हरभऱ्यात मंदी दिसून येत आहे. याच दरम्यान केंद्र सरकारने ऑक्टोबर महिन्यासाठी साखरेचा कोटा २४ लाख टन जाहीर केला आहे. तसेच २२ सप्टेंबरपासून जीएसटीमध्ये कपात केल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी झाले आहेत. (Market Update)
ज्वारीमध्ये तेजी
सध्याच्या अतिवृष्टी व हवामानातील बदलामुळे ज्वारीच्या भावात वाढ झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या ज्वारीची दैनंदिन आवक सुमारे १५०० पोत्यांची असून, भाव २ हजार ३०० ते ४ हजार २०० रुपये प्रति क्विंटल दरात आहेत.
हरभऱ्यात मंदी
दरम्यान हरभऱ्याच्या भावात मंदी जाणवली आहे. दिवसेंदिवस हरभऱ्याची आवक कमी होत असून भावातही प्रति क्विंटल २०० रुपयांची घट झाली आहे. सध्या हरभऱ्याचे दर ४ हजार ८०० ते ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत.
सरकारने जाहीर केला साखरेचा कोटा
केंद्र सरकारने ऑक्टोबर महिन्यासाठी साखरेचा कोटा जाहीर केला आहे. याप्रमाणे या महिन्यासाठी साखरेचा उत्पादन व वितरणाचा एकूण कोटा २४ लाख टन ठरला आहे. हा निर्णय साखरेच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, बाजारभाव स्थिर ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांसह उद्योगांना योग्य तो लाभ मिळावा यासाठी घेण्यात आला आहे.
यावेळी अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, साखरेच्या कोट्यामुळे बाजारातील पुरवठा सुरळीत राहील आणि साखरेच्या दरात अनावश्यक चढ-उतार रोखले जातील. याशिवाय, साखर निर्मितीच्या उद्योगांना आवश्यक कच्चा माल मिळविण्यातही मदत होईल.
साखरेच्या या कोट्याचा वापर देशभरातील साखर उद्योग, शेतकरी व वितरण साखळ्यांवर थेट परिणाम करणार आहे. या निर्णयामुळे साखरेच्या भावात संतुलन येण्याची शक्यता आहे.
सोन्या-चांदीच्या दरातील वाढ
जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे सोन्या-चांदीच्या भावात सतत वाढ होत आहे. विविध देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जागतिक व्यापार युद्धामुळे राजकीय तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीमुळे सोन्याच्या भावात प्रचंड उसळी दिसून येत आहे.
शनिवारी सोन्याचा दर १ लाख १८ हजार रुपये प्रति तोळा या उच्चांकावर पोहोचला. चांदीच्या भावातही वाढ झाली असून सध्या ती १ लाख ४५ हजार रुपये प्रति किलो वर पोहोचली आहे.
गुंतवणूकदार आणि दागिने उत्पादकांकडून सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. दसरा-दिवाळीच्या काळात सोन्याची खरेदी करण्याची परंपरा असल्याने ग्राहक जरी उच्च दर असूनही खरेदीला मागे हटत नाहीत, परिणामी भाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चांदी आयातीत निर्बंध
केंद्र सरकारने साध्या चांदीच्या दागिन्यांच्या आयातीवर ३१ मार्च २०२६ पर्यंत निर्बंध लागू केले आहेत. मुक्त व्यापार करारांचा गैरवापर रोखण्यासाठी, तयार दागिन्यांच्या नावाखाली चांदीची आयात थांबविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. एप्रिल-जून २०२४–२५ ते एप्रिल-जून २०२५–२६ या कालावधीत प्राधान्य शुल्क सवलतींमुळे चांदीच्या आयातीत झपाट्याने वाढ झाली होती.
सोन्या-चांदीच्या भावात झालेली वाढ, साखरेचा जाहीर कोटा, जीएसटी कपात आणि हवामानातील बदल या सर्व घटकांचा परिणाम बाजारभावांवर दिसून येत आहे. विशेषतः शेतकरी, व्यापारी व गुंतवणूकदार यांना या परिस्थितीवर काटेकोर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.