नाशिक : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीची (Manmad Bajar Samiti) बाजार फी कमी करण्याच्या प्रश्नावरून तोडगा निघू न शकल्याने मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत बाजार समितीतील कांदा, मका, धान्याचे लिलाव बंद राहतील. बाजारातील कांद्याचे भाव रोज (Kanda Market) पडत असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. असे असतानाही यावर सामंजस्याची भूमिका न घेण्यात आल्याने बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीची बाजार फी शेकडा एक रुपया आहे. ही बाजार फी २५ पैशाने कमी करावी, अशी व्यापारी वर्गाची मागणी होती. या मागणीला प्रतिसाद देऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने ती दहा पैशाने कमी केली व उर्वरित पंधरा पैसेबाबतचा निर्णय एप्रिल महिन्यात घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दीपक गोगड यांनी याबाबत सांगितले की, जिल्ह्यातील पाचच बाजार समित्यांनी बाजार फी कमी केली आहे. या पाचही बाजार समित्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे. व्यापारी वर्गाच्या अर्जावर विचार करून संचालक मंडळाने बाजार फी दहा पैशाने एक जानेवारीपासून कमी करण्याचा निर्णय घेतला. एप्रिल महिन्यात ताळेबंद बघून निर्णय घेऊ असे आश्वासन व्यापारी वर्गास देण्यात आले होते. तरीही व्यापारी वर्गाने बाजार फी कमी करण्याचा आग्रह धरल्याने ना इलाजास्तव मार्केटमधील लिलाव बंद ठेवावे लागत असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.
पाचच ठिकाणी निर्णय नाशिक जिल्ह्यातील १७ बाजार समित्यांपैकी फक्त पाचच बाजार समित्यांनी बाजार फी कमी केली आहे. उर्वरित बारा बाजार समिती त्यात बाजार एक रुपया एवढीच आहे. बाजार समितीची फी २५ पैशाने कमी करावी, असा अर्ज व्यापारी वर्गाने दिल्यानंतर या प्रश्नावर कोणताही तोडगा निघू न शकल्याने १४ जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवसापासून कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव यावर तोडगा निघेपर्यंत बंद राहणार आहे.
Soybean Kharedi : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर; सोयाबीन खरेदीची मुदत वाढली