लातूर : महाराष्ट्र शासनाने माथाडी कामगारांच्या आरोग्याचा विचार करून ५० किलोपेक्षा जास्त वजनाचे ओझे वाहण्यास स्पष्ट बंदी घातली असतानाही, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. (Latur APMC)
बाजार समितीत आजही 'डबल एस' नावाच्या जड बारदान्याचा वापर सुरू असून, कामगारांकडून तब्बल १०० ते १२० किलो वजनाचे पोते उचलून घेतले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.(Latur APMC)
यामुळे माथाडी कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मणक्याचे विकार, सांधेदुखी, शारीरिक थकवा आणि दीर्घकालीन आजारांचा धोका वाढत असल्याची तक्रार कामगार संघटनांनी केली आहे.
शासनाच्या आदेशांना हरताळ फासून बाजार समितीत कामगारांकडून जादा वजनाची कामे करून घेतली जात असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
जिल्हा निबंधक आणि माथाडी मंडळाकडे निवेदन
या पार्श्वभूमीवर माथाडी कामगार संघटनांनी लातूर जिल्हा निबंधक तसेच लातूर-धाराशिव जिल्हा माथाडी व असंघटित कामगार मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव यांना निवेदन सादर केले.
बाजार समितीत वापरला जाणारा 'डबल एस' बारदाना तातडीने बंद करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
कामगारांच्या म्हणण्यानुसार, शासनाने ५० किलोची मर्यादा निश्चित केली असली तरी प्रत्यक्षात बाजार समितीत त्याच्या दुप्पट वजनाची पोती वापरली जात आहेत. त्यामुळे कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
'डबल एस' बारदान्यामुळे आरोग्य धोक्यात
माथाडी कामगारांचे काम हे पूर्णपणे शारीरिक श्रमावर आधारित असते. अशा परिस्थितीत १०० किलोपेक्षा जास्त वजनाची पोती वारंवार उचलल्याने गंभीर शारीरिक परिणाम होत असल्याचे कामगारांनी सांगितले. अनेक कामगारांना मणक्याचे आजार, कमरेचा त्रास आणि स्नायूंच्या वेदना जाणवत असल्याचा दावा संघटनांनी केला आहे.
कामगार संघटनांच्या मते, शासनाने स्पष्ट नियम लागू करूनही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संघटनांचा आक्रमक पवित्रा
या आंदोलनात जनसेवा माथाडी व श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिक पाडोळे, संस्थापक कार्याध्यक्ष लखन उद्धव साबळे, सचिन मुंडे, नरसिंग तरपे, रमेश अंकुशराव तसेच लोकसेवा माथाडी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माने आणि सचिव अमोल कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने माथाडी कामगार उपस्थित होते.
कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
जास्त वजनाच्या बारदान्यावर बंदी असतानाही बाजार समितीत नियमांचे उल्लंघन सुरू आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करून 'डबल एस' बारदाना बंद केला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
आता जिल्हा उपनिबंधक आणि माथाडी मंडळ या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेणार आणि बाजार समिती प्रशासनावर काय कारवाई होणार, याकडे लातूरमधील माथाडी कामगारांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Agriculture News : माथाडी कामगारांना दिलासा, पण शेतकऱ्यांचा खर्च वाढणार?
अधिक वाचा : Soybean Seed : सोयाबीन बियाण्यांवर मोठा खर्च टळणार; कृषी विभागाचा खास सल्ला
Web Summary : Latur APMC flouts rules, endangering Mathadi workers by forcing them to carry excessive weight. Despite a 50kg limit, workers lift 100-120kg, causing health issues. Unions demand action, threatening protests if 'Double S' sacks aren't banned.
Web Summary : लातूर एपीएमसी नियमों का उल्लंघन कर रहा है, जिससे माथाडी श्रमिकों का जीवन खतरे में है क्योंकि उन्हें अत्यधिक वजन उठाने के लिए मजबूर किया जाता है। 50 किलो की सीमा के बावजूद, श्रमिक 100-120 किलो उठाते हैं, जिससे स्वास्थ्य समस्याएं होती हैं। यूनियनों ने कार्रवाई की मांग की है और धमकी दी है कि अगर 'डबल एस' बोरियों पर प्रतिबंध नहीं लगाया गया तो विरोध प्रदर्शन किया जाएगा।