Latur APMC : 'डबल एस बारदाना'वरून हमाल व अडत्यांमध्ये झालेल्या वादामुळे लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती गुरुवारी दिवसभर बंद ठेवावी लागली. अचानक बाजार बंद झाल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली असून संपूर्ण दिवसभर खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प राहिल्याने लाखो रुपयांची उलाढाल थांबली.(Latur APMC)
अनेक शेतकऱ्यांचा माल आवारातच पडून राहिला, तर हमाल-मापाडी आणि गाडीवान यांसह हातावर पोट असणाऱ्यांनाही मोठा फटका बसला.(Latur APMC)
बारदाना वाद कसा पेटला?
शेतकरी आपापल्या उपलब्ध बारदानामध्ये शेतमाल बाजार समितीत आणतात. काही गोण्या या ५० किलो वजनाच्या मर्यादेपेक्षा अधिक भाराच्या असतात. या जड गोण्या उचलताना हमालांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगत ५० किलो मर्यादेचा नियम काटेकोरपणे अंमलात आणावा, अशी हमाल-मापाडी संघटनेची एकमताने मागणी आहे.(Latur APMC)
मात्र, 'डबल एस बारदाना' म्हणजेच मोठ्या आकाराच्या जाड गोण्या अचानक बंद करणे शक्य नसल्याचे अडते आणि बाजार समिती प्रशासनाचे मत आहे. यावरून दोन्ही गटात तणाव निर्माण होऊन बाचाबाची झाली आणि अखेर प्रशासनाने दिवसभरासाठी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.(Latur APMC)
हमालांचा ठाम पवित्रा
हमालांचा सरळ मुद्दा आहे की, ५० किलोपेक्षा जड गोणी उचलणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे शासनाचे आदेश तातडीने राबवावेत. त्याचबरोबर, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बाजार समितीने स्पष्ट नियम करावेत, अशी मागणी करण्यात आली.(Latur APMC)
अचानक बंद अन्यायकारक
अडत्यांचा आणि अनेक शेतकऱ्यांचा आक्षेप असा की, अचानक बाजार बंद करून शेतकऱ्यांची अडवणूक करू नये. शेतकऱ्यांनी शेतमाल कुठेही विकण्याचा अधिकार आहे.
१०० किलो पोते ५० किलोवर आणल्यानंतर आता 'डबल एस' बारदाना बंद करणे म्हणजे शेतकऱ्यांवर जादा खर्चाचा बोजा.
काही शेतकरी म्हणाले की, हमीभाव न पाहता आम्ही माल आणला, पण बाजार बंद असल्याने सोयाबीनची खरेदीच झाली नाही. ही सरळ अडवणूक होत आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
वाद मिटला, शुक्रवारपासून व्यवहार सुरळीत
५० किलोपेक्षा जास्त वजनाची गोणी बाजारात आणू नये. बारदाना टप्प्याटप्प्याने बंद करू. शेतकऱ्यांत जागृती सुरू आहे. शुक्रवारी बाजार समितीचे कामकाज सुरळीत सुरू होईल.- जगदीश बावणे, सभापती, बाजार समिती
हमालांचा विरोध योग्यच आहे, पण बाजार बंद करण्याचा निर्णय सर्व घटकांना विश्वासात घेऊनच झाला पाहिजे. नियमावलीसाठी स्वतंत्र समिती नेमावी. - हर्षवर्धन सवई, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी महामंडळ
बंदचा परिणाम
* शेतमालाची खरेदी-विक्री पूर्ण ठप्प
* कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबली
* हजारो शेतकरी मालासह परत गेले
* दिवसभर काम करणारे हमाल, गाडीवान, मापाडी यांचे नुकसान
* व्यवहार ठप्प झाल्याने अडत्यांचेही नुकसान
'डबल एस बारदाना'चा वाद हा शेतकरी, हमाल, अडते या तिघांच्या हिताचा समतोल राखत सोडवण्याची गरज आहे. प्रशासनाने मध्यस्थी करून शुक्रवारपासून कामकाज सुरळीत सुरू करण्याचे आश्वासन दिले असले, तरी दीर्घकालीन तोडगा निघेपर्यंत अशा प्रकारचे वाद पुन्हा उद्भवण्याची शक्यता कायम आहे.
