Latur APMC : लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात गेल्या आठवड्यात ‘डबल एस’ बारदाण्यावरून हमाल आणि अडते यांच्यात निर्माण झालेला वाद अखेर मिटला आहे. सलग तीन दिवस ठप्प असलेली बाजारपेठ सोमवारी पुन्हा सुरू झाली असून शेतकऱ्यांनी दिलासा व्यक्त केला आहे.(Latur APMC)
वाद कशावरून झाला?
'डबल एस' बारदाना वापर बंद करण्याची हमालांची मागणी जोर धरू लागली होती. या बारदाण्यामुळे वजनात गोंधळ होतो, कामात अडचणी निर्माण होतात, असा आरोप हमालांनी केला. त्यांनी बारदाना पूर्णपणे बंद करण्याचा आग्रह धरत आंदोलन छेडले.
त्या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासनाला तोडगा काढण्यासाठी तीन दिवस बाजार बंद ठेवावा लागला. या बंदमुळे करोडो रुपयांची उलाढाल प्रभावित झाली. शेतकरी, व्यापारी, मजूर या सर्वांवर त्याचा परिणाम झाला.
शनिवारी दोन्ही बाजूंची बैठक
शनिवारी हमाल आणि अडते यांच्यात बैठक झाली. दोन्ही बाजूंच्या मागण्या आणि अडचणी ऐकल्यानंतर तात्पुरता तोडगा निघाला. त्यानंतर बंद मागे घेण्यात आला आणि सोमवारी बाजार समिती पुन्हा सुरू झाली.
सोमवारी व्यापार सुरू
बाजार उघडला असला तरी 'बाजार सुरू होईल का?' या अनिश्चिततेमुळे सोमवारी आवक मर्यादित राहिली. एकूण आवक १७ हजार ५०३ क्विंटल झाली. त्यात सोयाबीनची आवक १५ हजार २५३ क्विंटल झाली.
सोयाबीनचे दर
कमाल दर : ४ हजार ७०० रु. प्रति क्विंटल
सर्वसाधारण दर : ४ हजार ५०० रु. प्रति क्विंटल
मंगळवारपासून आवक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
'डबल एस' बारदाण्याचा वाद काय?
सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात 'डबल एस' बारदाना वापरला जातो. परंतु शासनाने हा बारदाना टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
'डबल एस' बारदाना बंद करण्याचा निर्णय हा शासनाचा आहे, बाजार समितीचा नाही. आम्ही फक्त शेतकऱ्यांना आवाहन करू शकतो. १०० किलोचा बारदाणा बंद करण्यास चार वर्षे लागली. 'डबल एस' बारदाणाही हळूहळू बंद होणार आहे. यामुळे बाजारातील सध्याचा तणाव काही प्रमाणात कमी झाला आहे. -जगदीश बावणे, सभापती, लातूर
शेतकऱ्यांना काय फायदा?
* तीन दिवसांच्या बंदमुळे थांबलेले व्यवहार पुन्हा सुरू
* सोयाबीनचे भाव स्थिर
* बाजार खुले झाल्याने विक्रीवरील अनिश्चितता दूर
* आगामी दिवसांत आवक वाढल्यास बाजाराचा वेग पुन्हा सामान्य होण्याची शक्यता
लातूरच्या कृषी बाजार समितीत गेलेल्या काही दिवसांत 'डबल एस' बारदाण्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद आता निवळला आहे. हमाल–अडते यांच्यातील चर्चेनंतर बाजार समितीने व्यापार सुरळीत सुरू केला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आगामी काही दिवसांत बाजारातील वातावरण स्थिर राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
