नवी मुंबई : जुन्या लसणाचा हंगाम शेवटच्या टप्प्यावर असून, बाजारभाव गतवर्षीपेक्षा निम्यावर आहेत. फेब्रुवारीपासून नवीन मालाची मोठ्या प्रमाणात आवक होईल. आवक कशी होणार यावर नवीन हंगामातील लसणाचे दर अवलंबून राहणार आहेत.
मुंबई बाजार समितीमध्ये जानेवारी २०२५ मध्ये लसणाचे दर १०० ते २१० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. किरकोळ मार्केटमध्ये लसूण ४०० ते ५०० रुपयांवर पोहोचला होता. फेब्रुवारीनंतर आवक वाढल्यावर दर नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली. लसणाचे दर हे उच्चभ्रू वस्तीच्या ठिकाणी तर जास्तही असतात. मात्र गतवर्षी तुलनेने दर काहीसे कमी होते.
परराज्यातून मोठी आवकप्रत्येक वर्षी डिसेंबरअखेर व जानेवारीची सुरुवात हा लसूण हंगामाचा शेवट असतो. जानेवारीअखेरपासून नवीन आवक सुरू होत असते. बाजार समितीमध्ये सर्वाधिक लसणाची आवक मध्यप्रदेश व राजस्थानमधून होते. चायनाचा लसूणही विक्रीसाठी येत असतो. सद्यःस्थितीमध्ये बाजार समितीमध्ये ४० ते ११० रुपये किलो दराने लसणाची विक्री होत आहे.
किरकोळ बाजारात १०० ते २६० रुपये किलो भावकिरकोळ मार्केटमध्ये हेच दर १०० ते २६० रुपयांपर्यंत आहेत. उच्चभ्रू नागरिकांची वसाहत असलेल्या ठिकाणी बाजारभाव ३०० पर्यंतही आहेत. गतवर्षी जानेवारी अखेरीला होलसेल मार्केटमध्ये लसणाचे दर १०० ते २१० रुपयांपर्यंत होते. किरकोळ मार्केटमध्ये ४०० ते ५०० रुपयांपर्यंत दर गेले होते. यावर्षी त्या तुलनेने दर कमी आहेत. नवीन मालाची आवक कधी होते यावर पुढील दर अवलंबून राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मागील वर्षभर दर कसे राहिले? जानेवारी १०० ते २१० रुपये किलो, फेब्रुवारी ३० ते ८० रुपये किलो, मार्च ४० ते ११० रुपये किलो, एप्रिल २० ते ८० रुपये किलो, मे ४० ते ११० रुपये किलो, जून ३० ते १०० रुपये किलो, जुलै २० ते ८० रुपये किलो, ऑगस्ट २५ ते ७५ रुपये किलो, सप्टेंबर ३० ते ८० रुपये किलो, ऑक्टोबर २५ ते ७५ रुपये किलो, नोव्हेंबर २५ ते ७५ रुपये किलो, डिसेंबर ५० ते ११० रुपये किलो.