Lal Mirchi Market : जानेवारी २०२४ च्या तुलनेत या वर्षी जानेवारीमध्ये लाल मिरचीच्या (Lal Mirchi Market) किमतीत ३५ टक्के घट झाली आहे. या काळात लाल मिरचीचा भाव १९ हजार रुपये प्रति क्विंटलवरून १२ हजार ते १३ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरला. मागणी कमी असल्याने लाल मिरचीचे दर सतत घसरत (Red Chilly Market) आहेत, जे शेतकऱ्यांसाठी चिंतेचे कारण असून शेतकरी अडचणीत सापडत आहेत.
जागतिक मागणीत घट झाल्याने मिरचीच्या किमती (Mirchi Market Down) घसरल्या आहेत, असे व्यापार तज्ज्ञांनी म्हटले आहे. मसाले मंडळाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल-ऑक्टोबर २०२४ दरम्यान मिरचीची निर्यात ३.३१ लाख टन झाली, ज्याची किंमत $६४५.१५ दशलक्ष होती. तर गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यांत ७५७.८४ दशलक्ष डॉलर्स किमतीच्या ३.०४ लाख टन मिरचीची निर्यात करण्यात आली होती.
त्याच वेळी, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यांत मिरची निर्यातीत १५ टक्के घट नोंदवण्यात आली आहे. मिरचीची मागणी आणि किमती कमी झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तसेच मिरचीचे उत्पादन यंदा सरासरीच्या तुलनेत ३० ते ३५ टक्क्यांनी घटले आहे. परिणामी साधारणतः एप्रिल, मे पर्यंत राहणारा मिरचीचा हंगाम यंदा फेब्रुवारीच्या मध्यापर्यंतच राहणार अशी शक्यता निर्माण झाली असल्याचे एकुण परिस्थितीवरून दिसते
उत्पादन घटले...
जर आपण २०२३ मध्ये मिरचीचा दर पाहिला तर त्यावेळी तो २५ हजार रुपये प्रति क्विंटल होता, तर त्या वर्षी जागतिक स्तरावर मिरची लागवडीचे क्षेत्र १८.०३ लाख हेक्टर होते आणि उत्पादन ५८.२२ लाख टन होते. यंदा मिरचीचे उत्पादन कमी असल्याने भाव वाढतील अशी शक्यता होती. परंतु भाव स्थिर राहिल्याचे चित्र आहे. सरासरी २५०० ते ४२०० रुपये क्विंटल असा भाव आहे. मिरचीच्या प्रतवारीनुसार आणि वाणानुसार भाव मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी आता आहे, त्या स्थितीत मिरची विकून मोकळे होत असल्याचे सांगण्यात आले.
असे आहेत बाजारभाव
पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार मागील आठवड्याचा बाजारभाव पाहिला असता लोकल मिरचीला चांगला बाजारभाव मिळत आहे. जवळपास क्विंटलला कमीत कमी १० हजार रुपयांपासून ते सरासरी २२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळतो आहे. तर ओल्या मिरचीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत असून कमीत कमी ०३ हजार रुपयांपासून ते ०६ हजार रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. तर हायब्रीड मिरचीचा विचार केला तर ०७ ते ०८ हजार रुपये इतका सरासरी दर मिळतो आहे.